Black Box in Plane | अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 737-8 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात झाला आणि संपूर्ण देश हादरला. २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अपघातस्थळी यंत्रणांनी चौकशी सुरु केली असून, सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणून ‘ब्लॅक बॉक्स’ शोधण्यात आला आहे. पण अनेकांना प्रश्न पडतो, हा ब्लॅक बॉक्स नेमका काय असतो?. (Black Box in Plane)
‘ब्लॅक बॉक्स’ हा केशरी रंगाचा असतो. हे उपकरण विमानातील सर्व तांत्रिक आणि संभाषण संबंधित माहिती रेकॉर्ड करत असतं. यामुळे अपघाताचं कारण शोधणं अधिक सोपं होतं. त्यामुळेच विमान अपघातानंतर सर्वप्रथम याच बॉक्सचा शोध घेतला जातो.
दोन भागांत विभागलेला असतो ‘ब्लॅक बॉक्स’ :
ब्लॅक बॉक्स दोन स्वतंत्र भागांत विभागलेला असतो — डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR). DFDR विमानाची वेग, उंची, इंजिनचा थ्रस्ट, इंधनाचा वापर, हवामान आणि उड्डाण मार्ग यासारखी माहिती २४ तासांहून अधिक काळ रेकॉर्ड करतं. या माहितीचा उपयोग करून अपघाताचं संभाव्य कारण स्पष्ट केलं जातं. (Black Box in Plane)
दुसरीकडे, CVR हे कॉकपिटमधील संभाषण, पायलट व को-पायलट यांचं बोलणं, तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेल्या संवादाची रेकॉर्डिंग करतो. यामुळे शेवटच्या क्षणांमध्ये नेमकं काय घडलं, ते समजून घेण्यात मदत होते. त्यामुळे ब्लॅक बॉक्स म्हणजे फक्त एक उपकरण नाही, तर ते विमानाचं आठवणींचं भांडार असतं.
Black Box in Plane | अपघातातही सुरक्षित राहणारी रचना :
ब्लॅक बॉक्स प्रचंड तापमान, दाब, पाणी आणि धक्क्यांपासून सुरक्षित राहील, अशा प्रकारे तयार केले जाते. हे स्टील किंवा टायटॅनियमपासून बनवलेलं असतं आणि त्याचे वजन साधारणतः ४.५ किलो असते. विमानाच्या मागील भागात हे डिव्हाइस ठेवले जातं कारण अपघातामध्ये हा भाग तुलनेने कमी धक्क्यांना सामोरा जातो.
पाण्यात कोसळलेल्या विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स (Black Box in Plane) शोधण्यासाठी त्यामध्ये खास ‘अंडरवॉटर लोकेटर बीकन’ असतो, जो ३० दिवसांपर्यंत सिग्नल पाठवत राहतो. त्यामुळे समुद्रातही शोधमोहिमेचे काम सुकर होते. आजच्या आधुनिक विमानांमध्ये सॉलिड स्टेट मेमरीचा वापर होत असल्यामुळे रेकॉर्डिंग अधिक स्पष्ट आणि सुरक्षित राहते.






