पुणे शहरात कसा असणार पाऊस?, हवामान विभागानं दिला मोठा इशारा

On: May 13, 2025 3:51 PM
weather update
---Advertisement---

Weather Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा अनुभव सुरूच आहे. आज मंगळवारी (13 मे) मुंबई (Mumbai), पुणे (Pune), तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई व ठाणे शहरांमध्ये यासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, दक्षिण कोकणातही अशाच स्वरूपाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता-

हवामान विभागाच्या (Weather Update) अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पाऊस आज (13 मे) अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्या भागात जोरदार पाऊस सुरू असून, पुढील 24 तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत मान्सून बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल सोमवारी (12 मे) राज्याच्या अनेक भागात सायंकाळी अवकाळी पावसाचा अनुभव आला होता. आज व उद्या (13 व 14 मे) महाराष्ट्रातील अनेक भागांत वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोकण-गोवा जिल्ह्यांना अलर्ट-

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या (Weather Update) ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण-गोवा क्षेत्रातही मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः पुणे शहरात पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून येथे सुरू असलेल्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय.

विदर्भात पाच जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’-

नागपूर (Nagpur) प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी बुधवार (14 मे) व गुरुवार (15 मे) ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. मागील काही दिवसांपासून वाऱ्यांची दिशा आणि वेग बदलल्यामुळे वातावरण पावसासाठी पोषक झालं आहे. त्यामुळे या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

नाशिक आणि त्रंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस-

नाशिक (Nashik) शहरासह त्रंबकेश्वर भागात देखील आज अवकाळी पावसाचा जोर अनुभवायला मिळाला. नाशिकमध्ये तब्बल 21 मिमी पावसाची नोंद झाली, तर त्रंबकेश्वरच्या रस्त्यांनी नदीसदृश स्वरूप घेतलं होतं. मे महिन्यातच इतक्या प्रमाणात पावसामुळे नालेसफाईच्या कामांची स्थिती उघड झाली आहे. पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होतं आणि वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

News Title – weather update Heavy Rain Alert in Maharashtra

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now