EPFO | तुम्ही EPFO, म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. तुम्हाला जर PF बॅलेन्स आणि शेवटच्या ठेवीसारखी माहिती पाहिजे असेल, तर आता प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. आता EPFO कडून मिस्ड कॉल सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत आता फक्त एक मिस्ड कॉल केला, की ही संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईल फोनवर मिळू शकते. विशेष म्हणजे ही सेवा मोफत आहे आणि त्यासाठी इंटरनेट किंवा स्मार्टफोनची देखील आवश्यकता नाही.
मिस्ड कॉलवर कोणती माहिती मिळणार :
EPFO ने या सेवेसाठी 9966044425 हा नंबर दिला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून या क्रमांकावर मिस्ड कॉल करता, तेव्हा तुम्हाला SMS द्वारे माहिती मिळते. यात तुमच्या PF खात्यात केलेली शेवटची रक्कम, एकूण PF बॅलेन्स, आणि UAN संबंधित माहिती मिळते.
ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि सर्व EPFO सदस्यांना, जर त्यांनी काही अटी पूर्ण केल्या असतील, तर उपलब्ध करण्यात आली आहे.
EPFO | ही सुविधा वापरण्यासाठी आवश्यक गोष्टी :
या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करणे आवश्यक आहे.
-
तुमचा मोबाईल नंबर तुमच्या UAN (Universal Account Number) शी संलग्न असायला हवा.
-
KYC कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
-
तुमचा बँक अकाउंट नंबर, आधार कार्ड (UID) आणि पॅन कार्ड यापैकी किमान एक कागदपत्र तुमच्या UAN शी लिंक असणे अनिवार्य आहे. अन्यथा या सेवेचा लाभ घेता येणार नाही.
मिस्ड कॉलची प्रक्रिया :
-
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9966044425 वर मिस्ड कॉल द्या.
-
दोन रिंगनंतर कॉल डिस्कनेक्ट होतो.
-
त्यानंतर तुम्हाला SMS येईल, ज्यात तुम्हाला PF विषयी माहिती दिली जाईल.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुमचे UAN सक्रिय असणे आवश्यक आहे.






