Vincy Aloshious | चित्रपटसृष्टी कोणतीही असो, ड्रग्जशी संबंधित प्रकरणं वेळोवेळी समोर येतच असतात. यावेळी मल्याळम अभिनेत्री विंसी अलोशियस (Vincy Aloshious) हिने एक धक्कादायक खुलासा करत ड्रग्ज सेवन करणाऱ्या कलाकारांविषयी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. तिने स्पष्ट केलं की अशा व्यक्तींसोबत ती कधीच काम करणार नाही.
ड्रग्ज घेणाऱ्या सहकलाकारामुळे सेटवर आला त्रासदायक अनुभव
केरळमधील पल्लीपुरम चर्चमध्ये आयोजित केसीवायएम एर्नाकुलम-अंगमाली मेजर आर्चडायोसीजच्या 67व्या कार्यकारी वर्षात विंसीने आपली मतं मांडली. ती म्हणाली, “जर मला एखाद्याच्या ड्रग्ज सेवनाबद्दल समजलं, तर मी त्याच्यासोबत चित्रपटात काम करणार नाही.” यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली.
यानंतर विंसीने तिच्या वैयक्तिक अनुभवाचा व्हिडीओ शेअर करत एका चित्रपटातील प्रसंग उलगडून सांगितला. संबंधित अभिनेता ड्रग्जच्या नशेत तिच्याशी असभ्य वागला होता. ड्रेसमध्ये अडचण असल्यावर त्या अभिनेत्याने सर्वांसमोर “मी तुला तयार व्हायला मदत करतो,” असं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर संपूर्ण सेटवर अस्वस्थ वातावरण निर्माण झालं होतं.
सेटवर ड्रग्जचा वापर खुलेपणाने; विंसीने घेतला स्पष्टवक्ती निर्णय
विंसी पुढे म्हणाली, “एका सीनच्या रिहर्सलदरम्यान त्या अभिनेत्याच्या तोंडातून पांढऱ्या रंगाचा पदार्थ टेबलावर पडला. त्यामुळे तो सेटवर ड्रग्ज घेतोय हे स्पष्ट झालं.” त्याच्या अशा वागण्यामुळे इतर कलाकार आणि सेटवरील टीमसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.
“खासगी आयुष्यात कोणी ड्रग्ज घेत असेल, तरी कामाच्या ठिकाणी त्याचा परिणाम होणं अयोग्य आहे,” असं ती म्हणाली. विंसीने स्पष्ट केलं की, “मला अशा प्रकारचं वातावरण नको आहे. ज्या व्यक्तीला आपल्या वागणुकीचा इतरांवर काय परिणाम होतोय याची जाणीवही नसेल, त्याच्यासोबत मी कधीच काम करणार नाही. हा निर्णय मी माझ्या अनुभवातून घेतलाय.”
Title: Vincy Aloshious Rejects Working with Drug Users






