Vinayak Raut | ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्याविरोधातील कौटुंबिक वाद अधिकच चिघळला आहे. त्यांचा मुलगा आणि मुंबई महापालिकेचा (Brihanmumbai Municipal Corporation) नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांची पत्नी गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पोलिस तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात अनेक धक्कादायक दावे समोर आले असून, त्यावर विनायक राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
वैवाहिक आयुष्याबाबत सूनेचे गंभीर आरोप:
गिरीजा राऊत यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत पती गितेश राऊत आणि सासरच्या कुटुंबाकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पती वारंवार शारीरिक संबंध टाळत होते. त्यासाठी कधी मुंबईतील घरात आईला आवाज जाईल, तर गावी मदतनीस ऐकेल, अशी विविध कारणे दिली जात होती. परदेश दौऱ्यादरम्यान जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यावरही पतीने दूर राहण्यास सांगत मारहाण केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हाही नोंदवला आहे.
तक्रारीत गिरीजा राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, सततच्या वागणुकीमुळे त्या मानसिक तणावाखाली गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडे उपचार घेतले. डॉक्टरांनी त्यांना आणि त्यांच्या पतीलाही अँटी-डिप्रेसंट औषधे दिली होती. मात्र, पती ती औषधे नियमित घेत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच वैवाहिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी सेक्सोलॉजिस्ट यांचीही भेट घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आयव्हीएफ आणि विनायक राऊतांबाबतही गंभीर दावा :
गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत असा आरोपही केला आहे की, नैसर्गिक पद्धतीने मूल होण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध असतानाही पतीकडून आयव्हीएफ (IVF) प्रक्रियेसाठी दबाव टाकण्यात आला. एवढेच नव्हे, तर ही प्रक्रिया घरातूनच करण्याबाबतही आग्रह धरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सर्व घडामोडी त्यांनी आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांच्या पालकांनी विनायक राऊत यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
यावेळी विनायक राऊत यांनी, “त्या दोघांमध्ये अद्याप शारीरिक संबंध झालेले नाहीत. त्यांच्यात तशी परिस्थितीही निर्माण झालेली नाही. मी कणकवली (Kankavli) येथे टेस्ट ट्यूब बेबी (Test Tube Baby) प्रक्रियेबाबत माहिती घेतली आहे. आधी त्या प्रक्रियेतून मूल होऊ द्या, त्यानंतर ते दोघे शारीरिक संबंधांच्या विषयाकडे पाहतील,” असे सांगितल्याचा गंभीर आरोप गिरीजा राऊत यांनी पोलिस तक्रारीत केला आहे. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, विनायक राऊत यांनी माध्यमांसमोर येत गिरीजा राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेबाबत आणखी काही दावे मांडले.






