EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफ खात्यांमध्ये 8.25 टक्के दराने व्याज जमा करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलैपर्यंत सदस्यांच्या खात्यात व्याजाची नोंद पासबुकमध्ये दिसू शकते. दरम्यान, पीएफवरील व्याजाची गणना आणि बॅलेन्स वाढण्याची प्रक्रिया कशी होते, याबाबत अनेक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
पीएफवरील व्याजाची गणना नेमकी कशी होते? :
अनेकांना 8.25 टक्के वार्षिक व्याजदराचा अर्थ दर महिन्याला 12 भागांमध्ये व्याज जमा होते, असा गैरसमज असतो. प्रत्यक्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees’ Provident Fund Organisation) दर महिन्याच्या शिल्लक रकमेवर व्याजाची गणना करते. मात्र, त्या व्याजाची एकूण रक्कम वर्षअखेरीस एकदाच पीएफ खात्यात जमा केली जाते.
दर महिन्याला कर्मचारी आणि नियोक्त्याकडून पीएफ खात्यात योगदान जमा होत असल्याने खात्यातील मूळ रक्कम सातत्याने वाढत जाते. त्यानुसार पुढील महिन्यात वाढलेल्या शिल्लक रकमेवर व्याजाची गणना केली जाते. अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला मूळ रक्कम वाढत राहते आणि त्यावर मिळणारे व्याजही वाढत जाते. यालाच कम्पाऊंडिंग (Compounding) चा परिणाम म्हणतात. त्यामुळे दीर्घकालीन बचतीत मोठी वाढ होऊन निवृत्तीच्या वेळी चांगला निधी उपलब्ध होतो.
2 लाखांच्या शिल्लकीवर व्याज आणि बॅलेन्स तपासण्याची पद्धत :
उदाहरणार्थ, 1 एप्रिल रोजी तुमच्या पीएफ खात्यात 2 लाख रुपये शिल्लक असल्यास त्यावर वार्षिक 8.25 टक्के दराने व्याजाची गणना केली जाते. त्यानंतर मे महिन्यात जमा होणारे नवीन योगदान या शिल्लकीत जोडले जाते आणि पुढील महिन्यात वाढलेल्या रकमेवर व्याज मोजले जाते. ही प्रक्रिया संपूर्ण आर्थिक वर्षभर सुरू राहते. त्यामुळे प्रत्येक महिन्यागणिक मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज दोन्ही वाढत राहतात. आर्थिक वर्ष संपल्यानंतर एकत्रित व्याजाची रक्कम पीएफ खात्यात जमा होते आणि ती पासबुकमध्ये दिसते.
पीएफ खात्यातील शिल्लक आणि व्याजाची माहिती जाणून घेण्यासाठी दोन सोपे पर्याय उपलब्ध आहेत. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास काही क्षणांत एसएमएसद्वारे खात्याची माहिती मिळते. तसेच मोबाईलमधून EPFOHO UAN MAR असा संदेश टाइप करून 7738299899 या क्रमांकावर पाठवल्यासही पीएफ खात्यातील शिल्लक आणि व्याजाची माहिती एसएमएसद्वारे मिळू शकते. इतर भाषांमध्ये माहिती मिळवण्यासाठी संबंधित भाषा कोड वापरावा लागतो.






