Girija Raut | ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या कुटुंबाशी संबंधित प्रकरणात नवे घडामोडी समोर आल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी अघोरी विधी केल्याचा गंभीर आरोप करत दिलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आलेल्या फिरोज शेख (Firoz Shaikh) याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंकडून न्यायालयात महत्त्वाचे युक्तिवाद करण्यात आले.
सरकारी पक्षाने न्यायालयात काय मांडले? :
अटक केलेल्या फिरोज शेखला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गिरीजा राऊत यांचे वकील सागर कदम (Sagar Kadam) यांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणातील पहिले तीन आरोपी म्हणजे गिरीजा राऊत यांचे पती गितेश राऊत (Gitesh Raut), माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या सासू आहेत. मुलं होत नसल्यामुळे तपासण्या करण्यात आल्या आणि त्यानंतर अघोरी प्रकार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारी पक्षाच्या मते, तपासादरम्यान घटनास्थळावरून लिंबू, टाचण्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तक्रारदार स्वतः घटनास्थळी उपस्थित होत्या आणि त्यांनी आरोपीची ओळख पटवून दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तसेच आरोपीकडून आरोप मान्य करण्यात येत असल्याचा दावाही सरकारी पक्षाने न्यायालयात केला.
Girija Raut | बचाव पक्षाचा युक्तिवाद काय होता? :
फिरोज शेख यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणाची तक्रार 10 जुलै रोजी दाखल झाली असली तरी तक्रारीत फिरोज शेख नेमके कधी संबंधित ठिकाणी आले याचा कोणताही उल्लेख नाही. यापूर्वी इतर कोणत्या बाबांकडे गेल्याची नोंदही तक्रारीत नसल्याचे त्यांनी नमूद केले. फिरोज शेख यांच्या वडिलांचा दर्गा (Dargah) असून, त्या ठिकाणच्या धार्मिक विधींची जबाबदारी त्यांच्याकडे होती. संबंधित व्यक्तींना त्यांनी बोलावले नव्हते, तर ते स्वतःहून आले होते, असा दावा बचाव पक्षाने केला. तसेच जप्त करण्यात आलेले धागे, दोरे आणि लिंबू याबाबतही प्रश्न उपस्थित करत न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.
यावर प्रत्युत्तर देताना गिरीजा राऊत यांचे वकील सागर कदम यांनी, आरोपीच्या वकिलांनीच दर्ग्यात पूजाविधी होत असल्याचे मान्य केले आहे, त्यामुळे तपासात मिळालेल्या माहितीला पुष्टी मिळते, असा युक्तिवाद केला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावाही त्यांनी न्यायालयात केला. महाराष्ट्र (Maharashtra) मध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने फिरोज शेख याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.






