वसई-विरारकरांचा प्रवास आता सुसाट! मेट्रो 13 मार्गिकेला अखेर हिरवा कंदील

On: August 19, 2026 2:05 PM
Vasai Virar Metro
---Advertisement---

Vasai Virar Metro | मिरा भाईंदर आणि वसई-विरार (Vasai-Virar) परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मेट्रो 13 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या 25.03 किलोमीटरच्या मार्गामुळे या भागातील मुंबईशी संपर्क अधिक वेगवान होणार आहे.

25 किमीच्या मार्गावर 16 स्थानके :

मेट्रो 13 हा प्रकल्प ठाणे आणि पालघर (Palghar) या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक प्रकल्प ठरणार आहे. या मार्गाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA करणार आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 17,724.99 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकूण 25.03 किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी 21.78 किलोमीटर अंतर एलिव्हेटेड पद्धतीने, तर 3.25 किलोमीटरचा भाग भूमिगत स्वरूपात उभारला जाणार आहे.

या मार्गावर एकूण 16 मेट्रो स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यापैकी 13 स्थानके उन्नत स्वरूपाची असतील, तर तीन स्थानके भूमिगत असणार आहेत. मेट्रो 13 मुळे मीरा रोड, नायगाव (Naigaon), वसई, नालासोपारा आणि विरार (Virar) हे प्रमुख परिसर एकमेकांशी जोडले जातील. त्यामुळे सध्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना आणखी एक जलद सार्वजनिक वाहतूक पर्याय मिळणार आहे. या प्रकल्पामुळे संबंधित भागातून प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ जवळपास 50 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Vasai Virar Metro | वसई खाडीवर डबल डेकर पूल :

मेट्रो 13 प्रकल्पातील सर्वात महत्त्वाच्या बांधकामांपैकी एक म्हणजे वसई खाडीवरील संयुक्त पूल आहे. पांजू बेटाला जोडणाऱ्या या पुलाची लांबी 4.92 किलोमीटर असणार आहे. या डबल डेकर पुलाच्या खालच्या स्तरावर सहा पदरी रस्ता उभारला जाणार असून, त्याच्या वरच्या भागातून मेट्रो धावणार आहे. त्यामुळे एकाच पायाभूत सुविधेतून रस्ते वाहतूक आणि मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे.

प्रकल्पासाठी चिखल डोंगरी (Chikhal Dongri) येथे मुख्य मेट्रो डेपो उभारण्याचे नियोजन आहे. मेट्रो 13 ची जोडणी नायगाव, नालासोपारा आणि विरार या उपनगरीय रेल्वे स्थानकांशी केली जाणार आहे. याशिवाय नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे या मार्गाची मेट्रो 9 सोबत जोडणी होईल. प्रवाशांना स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पुढील प्रवासासाठी सर्व स्थानकांवर फीडर बसची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या प्रकल्पासाठी 24.84 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील सहा महिन्यांत भूसंपादनाची प्रक्रिया तसेच आवश्यक पोहोच रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

News title : Vasai Virar Metro 13 Gets Approval

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now