Pune Ganeshotsav | पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि स्पीकर्सच्या वापरावरून वाद निर्माण झाला आहे. गणेश मंडळांवरच अटी-निर्बंध लादले जात असल्याचा आरोप करत भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांना थेट इशारा दिला आहे. मुंबईतील दहीहंडीला वेगळे नियम आणि पुण्यातील गणेशोत्सवाला वेगळे निर्बंध का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून मंडळांशी चर्चा करून निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
डीजेच्या मुद्द्यावर गणेश मंडळे आक्रमक :
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील काही ठिकाणी गणेशोत्सव तसेच दहीहंडीच्या कार्यक्रमांसाठी डीजे लावण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी त्याला विरोध करत स्पीकर्स बंद केले. आगामी दहीहंडी उत्सवातही अशाच प्रकारची भूमिका कायम ठेवली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आल्याने गणेश मंडळे आणि दहीहंडीशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उत्सवाच्या आयोजनावरून वातावरण अधिक तापले आहे.
भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा, पुण्यातील गणेशोत्सवावरच अटी आणि निर्बंध का लादले जात आहेत?’ असा सवाल त्यांनी केला. पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव लक्षात घेता पोलिस किंवा प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. कोणतेही नियम किंवा निर्बंध लागू करण्यापूर्वी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन चर्चा करावी आणि त्यातून तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
Pune Ganeshotsav | नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढणार :
या वादाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांमधील काही कार्यकर्त्यांनी भाजपचे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांची भेट घेतली. स्पीकर्सच्या वापरावर पोलिसांनी बंदी कायम ठेवली, तर विसर्जनाच्या दिवशी गणेशाची मूर्ती मंडपातून बाहेरच काढणार नाही, असा इशाराही काही कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या मुद्द्यावरून गणेश मंडळे आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गणेश बीडकर यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनीही गणेश मंडळांना उत्सवाचा उपयोग समाजासाठी सकारात्मक संदेश देण्यासाठी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून मराठी संस्कृती, कला, संगीत, सामाजिक एकोपा आणि समाजप्रबोधनाची परंपरा आहे. त्यामुळे तरुण पिढीला सकारात्मक दिशा मिळेल, अशा उपक्रमांना प्राधान्य द्यावे.








