Ola Uber Rapido Rules | महाराष्ट्रातील ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) या ॲपवरून प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य परिवहन विभागाकडून ॲप-आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या चालकांसाठी नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत. ही नवी नियमावली 1 सप्टेंबर 2026 पासून राज्यभर लागू होणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते.
ॲप कॅब चालकांसाठी नियम अधिक कडक :
नव्या नियमांनुसार, ॲपच्या माध्यमातून प्रवासी सेवा देणाऱ्या सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांना परिवहन प्राधिकरणाकडून अधिकृत परवाना घेणे बंधनकारक असेल. संबंधित वाहनचालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि बॅच असणे आवश्यक आहे. याशिवाय प्रवाशांशी व्यवहार करण्यापुरते मराठी भाषेचे ज्ञान चालकाला असणेही अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सेवा देणाऱ्या चालकांसाठी मराठीचे प्राथमिक ज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.
चालकाच्या बॅचसाठी अर्ज करताना मुंबई किंवा संबंधित शहरातील 15 वर्षांचा रहिवासी दाखला आणि पोलीस पडताळणीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. वाहन चालवण्याच्या वेळेलाही मर्यादा घालण्यात आली असून चालकाला सलग 12 तासांपेक्षा जास्त काळ वाहन चालवता येणार नाही. प्रवाशांकडून मिळणाऱ्या एकूण भाड्यातील किमान 80 टक्के रक्कम थेट चालकाला मिळेल, अशी तरतूदही नव्या नियमांमध्ये करण्यात आली आहे.
Ola Uber Rapido Rules | GPS देखरेखीसह मराठी भाषेतील ॲप अनिवार्य :
प्रवासी आणि चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांमध्ये GPS Tracking व्यवस्था असणे आवश्यक राहणार आहे. त्यासोबतच चालकांची पडताळणी आणि वाहनांच्या हालचालींवर ऑनलाइन पद्धतीने देखरेख केली जाणार आहे. ॲग्रीगेटर कंपन्यांच्या मोबाइल ॲप्स तसेच वेबसाइट्सही आता तीन भाषांमध्ये उपलब्ध असणे बंधनकारक केले जाणार आहे. मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय ग्राहकांना मिळणे आवश्यक असेल.
बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाना मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकरणात संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्यासोबतच कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान, सुमारे तीन महिन्यांपूर्वी परिवहन विभागाने राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती.
आता या नियमांच्या पुढील अंमलबजावणीत मराठीचे ज्ञान नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर परिवहन विभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित प्रवासी सेवांनाही नव्या नियमांच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून चालक, कंपन्या आणि प्रवासी सेवा व्यवस्थेत महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.






