ग्रामपंचायत सदस्य असलेल्या आईच्या चारित्र्यावर मुलाचा संशय… पुढे घडला भयानक प्रकार!

On: August 22, 2023 1:49 PM
---Advertisement---

वसईच्या माजिवली-देपिवली ग्रामपंचायत क्षेत्रात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेची तिच्याच सख्ख्या मुलाने हत्या केली आहे. कृत्य किती क्रूर होतं पाहा या मुलाने आपल्या आईचा थेट गळाच चिरला आहे. वसई तालुक्यातील देपीवली गावात ही घटना घडली. रविवार दिनांक 20 ऑगस्टच्या रात्री 10 वाजताच्या सुमारास मुलाने आपल्या आईची हत्या केली. सुनिता सुनिल घोघरा असं या महिलेचं नाव आहे, त्या 36 वर्षांच्या होत्या.

सुनिता घोघरा या देपीवली गावात आपल्या कुटुंबासह राहत होत्या. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत त्या माजिवली देपिवली ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून देखील निवडून आल्या होत्या. अशा या महिलेची चक्क स्वत:च्याच मुलाने कुऱ्हाडीचे वार करुन हत्या केली आहे. चारित्र्यावर संशय हे या हत्येचं मूळ कारण आहे. आरोपी मुलाचं वय ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, कारण तो अवघ्या 17 वर्षांचा आहे. त्याने असं काही कृत्य केलं आहे यावर शेजाऱ्यापाजाऱ्यांचा अजिबात विश्वास बसत नाहीये.

17 वर्षीय मुलाने नेमकी कशी केली आईची हत्या?

सुनिता घोघरा ही महिला ग्रामपंचायत सदस्य असली तरी नोकरीला जात होती. वालीव परिसरात एका ठिकाणी तिची नोकरी होती. रविवार सुट्टी असल्याने या दिवशी ती घरातच होती. रात्रीचे जेवण करुन ती आपल्या खोलीत झोपी गेली असताना तिचा अल्पवयीन मुलगा आला, त्याने तिच्यावर कुऱ्हाडीने तीन वार केले आणि आपल्या आईला रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो तसाच घराबाहेर पडला.

काही वेळ गेला असेल, त्यानंतर मृत महिलेचा पती घरी आला. त्याने आपली पत्नी सुनिताला जखमी अवस्थेत पडलेलं पाहिलं. त्याने आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे गोळा झाले. जखमी सुनिताला उपचारांसाठी भिवंडी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि तिला मृत घोषित केलं.

पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. संबंधित घटनेची नोंद मांडवी पोलिसात करण्यात आली. पोलिसांनी यानंतर तपासाची सूत्रे हलवत पहिल्यांदा तिच्या पतीला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मुलाला देखील ताब्यात घेतलं. दोघांकडे चौकशी केली असता आपणच आपल्या आईची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची कबुली मुलाने दिली.पोलिसांनी याप्रकरणी हकीकत नोंदवून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

आरोपी मुलानं काय सांगितलं?

आईच्या चारित्र्यावर संशय असल्याने आपण हे कृत्य केल्याची माहिती सुनिता घोघराच्या मुलाने पोलिसांना दिली. आई घरात झोपली असताना मी तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. आईच्या चारित्र्यावर संशय असल्याच्या संतापातून आपण हे पाऊल उचललं, असं तो पोलिसांना म्हणाला.

Join WhatsApp Group

Join Now