MS Dhoni | महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलमध्ये खेळत असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याची मतं कायम चर्चेत असतात. अलीकडेच धोनीने विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत केलेल्या विधानामुळे तो पुन्हा एकदा चाहत्यांच्या रडारवर आला आहे. विशेषतः 2027 च्या वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर त्याचं मत महत्त्वाचं मानलं जात आहे. (MS Dhoni on Rohit Sharma)
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, सध्या ते फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. आगामी वर्ल्डकपमध्ये त्यांना संधी मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत असताना धोनीने स्पष्ट मत मांडत सांगितलं की, कामगिरी आणि फिटनेसच्या जोरावर दोघांनाही संघात स्थान मिळायला हवं, वय हा मापदंड ठरू शकत नाही.
धोनीचं स्पष्ट मत :
धोनी म्हणाला, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 2027 चा वनडे वर्ल्डकप का खेळू नये? वय हा मापदंड नाही, तर कामगिरी आणि फिटनेस महत्त्वाचा आहे. मोठ्या सामन्यांमध्ये अनुभव कायमच उपयोगी पडतो.” धोनीच्या या वक्तव्याचं अनेक चाहत्यांनी स्वागत केलं असून, अनुभवी खेळाडूंना अजून संधी मिळायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. (MS Dhoni on Rohit Sharma)
मात्र, काही चाहत्यांनी धोनीवर टीकाही केली आहे. काहींनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, धोनी कर्णधार असताना त्याने काही दिग्गज खेळाडूंना दुर्लक्षित केलं होतं. त्यामुळे आज त्याने व्यक्त केलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
MS Dhoni | टीम इंडियाच्या संधींबाबतही धोनीचं मत :
धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला होता, तर रोहित शर्माच्या नेतृत्वात 2024 मध्ये टीम इंडियाने पुन्हा जेतेपद पटकावलं.
तसेच आता पुन्हा एकदा भारत तिसऱ्यांदा विश्वविजेते होईल का, असा प्रश्न उपस्थित होत असताना धोनीने सांगितलं की, टीम इंडियाकडे संपूर्ण क्षमता आहे, मात्र मैदानावरील दव हा मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्यामुळे नाणेफेक सामन्याच्या निकालावर मोठा परिणाम करू शकते, असंही त्याने स्पष्ट केलं.






