शिंदेंच्या आमदाराचा फडणवीसांवर थेट निशाणा; वाद पेटल्याने महायुतीमध्ये खळबळ!

On: February 4, 2026 6:50 PM
Mahayuti controversy
---Advertisement---

Mahayuti controversy | महायुतीत पुन्हा एकदा अंतर्गत तणाव उफाळून आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या या विधानानंतर भाजप आणि शिंदे गटात नव्या वादाची ठिणगी पडल्याचं चित्र दिसत आहे. (Suhas Babar statement)

खानापूरच्या पळशी येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना आमदार बाबर यांनी, “आमच्यासारखे 243 आमदार आहेत म्हणून ते मुख्यमंत्री आहेत,” असं वक्तव्य केल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच नव्हे तर “भाजपसह सगळे पक्ष आपण चालवतो,” असं विधानही त्यांनी केल्याचा दावा केला जात आहे. या वक्तव्यामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला :

आमदार बाबर यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant patil) यांनी या प्रकरणावर भाष्य करत, सुहास बाबर आणि त्यांचे वडील अनिल बाबर यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असल्याचं सांगितलं. त्यांनी असे का म्हटले, याबाबत मी फोन करून विचारणार असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं. (Mahayuti controversy)

तसेच, “ते जर सर्व पक्ष चालवत असतील तर चांगलंच आहे ना,” असा टोला लगावत त्यांनी बाबर यांच्या विधानावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली. भाजप नेते वैभव पाटील यांनीही बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.

Mahayuti controversy | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका :

या वादात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही उडी घेत जोरदार टीका केली आहे. “सुहास बाबर आणि त्यांचे वडील हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आमदार झाले, याची त्यांना जाणीव नाही,” असं म्हणत त्यांनी बाबर यांच्यावर निशाणा साधला. तसेच, “भाजपा पक्ष चालवायला तुमच्या सात पिढ्या याव्या लागतील,” असं म्हणत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, भाजपच्या टीकेनंतर आमदार सुहास बाबर यांनी स्पष्टीकरण देताना आपण मुख्यमंत्र्यांविषयी एकेरी शब्द वापरले नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “माझं विधान स्थानिक कार्यकर्त्याच्या बाबतीत होतं,” असं सांगत त्यांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणामुळे महायुतीतील तणाव अधिकच वाढल्याचं दिसून येत आहे.

News Title: Mahayuti Rift: Shinde Group MLA Suhas Babar’s Remark on CM Devendra Fadnavis Sparks Controversy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now