पुणे-कोकण प्रवाशांसाठी अलर्ट! ‘हे’ 2 घाट 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार

On: July 13, 2026 6:40 PM
Pune Konkan Route Closed
---Advertisement---

Pune Konkan Route Closed | पावसाळ्यात सुरू असलेल्या दरडी कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने वरंधा आणि आंबेनळी हे दोन्ही घाट काही कालावधीसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाचा निर्णय:

पुणे (Pune) आणि कोकण (Konkan) यांना जोडणारा महत्त्वाचा वरंधा घाट (Varandha Ghat) 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे वारंवार दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि अपघाताचा धोका वाढल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रांताधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या अभिप्रायानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे आदेश जारी केले.

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान वरंधा घाटात सुमारे 20 ते 25 ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. सध्या मुसळधार पाऊस कमी झाला असला तरी रिमझिम पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. अनेक वाहनचालकांना घाट बंद असल्याची माहिती नसल्याने पोलिसांनी विविध ठिकाणी बॅरिकेड्स उभारून सूचना फलक लावले आहेत. प्रवाशांनी या मार्गावर जाण्यापूर्वी परिस्थितीची माहिती घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन :

पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी माणगाव – निजामपूर – ताम्हिणी घाट (Tamhini Ghat) – मुळशी – पिरंगुट – पुणे हा पर्यायी मार्ग सुचविण्यात आला आहे. तर कोल्हापूर (Kolhapur) दिशेने जाणाऱ्यांनी राजेवाडी फाटा – पोलादपूर – महाबळेश्वर – वाई – सुरूर – सातारा – कराड – कोल्हापूर किंवा राजेवाडी फाटापोलादपूर – खेड – चिपळूण – पाटण – कराड – कोल्हापूर या मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, रायगड (Raigad) जिल्ह्यातील आंबेनळी घाट (Ambenali Ghat) देखील 31 जुलैपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे (Kishan Jawale) यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. मागील 15 दिवसांत या घाटात तीन वेळा दरडी कोसळल्याने वाहतूक तासन्‌तास विस्कळीत झाली होती. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशास तात्पुरती बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी सुरक्षित पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

News Title: Varandha, Ambenali Ghats Closed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now