Vaishnavi Hagawane | राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar Group) नेते राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Shashank Hagawane) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुळशी तालुक्यातील भुकूम (Bhukum) येथे शुक्रवारी (१६ मे) सायंकाळी घडली. हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे वैष्णवीने टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
हुंडा, मानसिक छळ आणि संशयास्पद वागणूक-
२०२३ मध्ये वैष्णवी (Vaishnavi Hagawane) आणि शशांक हगवणे यांचा प्रेमविवाह झाला होता. विवाहात ५१ तोळे सोने, चारचाकी गाडी, चांदीची भांडी आणि सुसगाव येथे महागड्या थाटात लग्न पार पडलं. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. विशेषतः चांदीची भांडी न दिल्याचा राग, चारित्र्यावर वारंवार संशय, आणि अपमानास्पद वागणूक यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती.
ऑगस्ट २०२३ मध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर, पती शशांक याने बाळाबाबत संशय घेत तिला मारहाण केली आणि घराबाहेर काढलं. त्या वेळी तिने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारासाठी तिला औंध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु सासरचं कोणीही तिला भेटायला आलं नव्हतं.
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल-
शुक्रवारी सकाळी वैष्णवीने (Vaishnavi Hagawane) तिच्या बेडरूममध्ये दरवाजा बंद करून गळफास घेतला. काही वेळानंतर पती शशांकने दरवाजा तोडून तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी तिच्या वडिलांनी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, मेहुणी करिश्मा आणि मेहुणा सुशील हगवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती, सासू आणि मेहुणीला अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.






