अमेरिकेचा इराणी जहाजांवर हल्ला; ड्रोन, क्षेपणास्त्रे, बोटी उद्ध्वस्त, होर्मुझ ताब्यात घेण्याचा प्रयत्न

On: March 20, 2026 12:11 PM
Strait of Hormuz
---Advertisement---

US Iran Conflict | इराण (Iran) आणि अमेरिका (USA) यांच्यातील तणावाला आता तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने आक्रमक पावले उचलली आहेत. या मोहिमेअंतर्गत अमेरिकन लष्कराने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सच्या मदतीने इराणी लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्यास सुरुवात केली असून, हा संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे.

आखाती देशांमधील ऊर्जा प्रकल्प आणि व्यापारी जहाजांवर इराणकडून ‘एकतर्फी हल्ला करणारी ड्रोन’ (One-way attack drones) वापरून मोठे नुकसान केले जात होते. या प्राणघातक मानवरहित विमानांना आकाशातच नष्ट करण्यासाठी अमेरिकन फौजांनी अपाचे हेलिकॉप्टर्स (Apache Helicopters) तातडीने तैनात केली आहेत. त्याचबरोबर, समुद्राच्या पृष्ठभागावरून अत्यंत कमी उंचीवर उड्डाण करणारी ए-10 वॉरथॉग (A-10 Warthog) लढाऊ विमानेही युद्धभूमीवर उतरवण्यात आली आहेत. ही विशेष विमाने इराणच्या अतिवेगाने हल्ला करणाऱ्या बोटींना अचूक टिपून उद्ध्वस्त करत आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या (Wall Street Journal) ताज्या वृत्तानुसार, अमेरिकेने उचललेल्या या आक्रमक पावलांमुळे इराणच्या सागरी ताकदीला जबरदस्त हादरा बसला आहे. मार्चच्या सुरुवातीपासून ठप्प झालेली या मार्गावरील जलवाहतूक पुन्हा सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेने धडक कारवाई हाती घेतली आहे. या सतत होणाऱ्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत इराणच्या 120 पेक्षा जास्त नौदल नौका आणि लष्करी मालमत्तेचे एकतर अतोनात नुकसान झाले आहे किंवा त्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत.

पेंटागॉनची बहुस्तरीय रणनीती आणि आखाती देशांची सुरक्षा

पेंटागॉनने (Pentagon) आखलेल्या या टप्प्याटप्प्याच्या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट इराणची क्रूझ क्षेपणास्त्रे, सशस्त्र बोटी आणि समुद्री सुरुंगांचा धोका मुळापासून संपवणे हे आहे. यासाठी अमेरिकेने आखाती मित्र राष्ट्रांना तब्बल 200 अब्ज डॉलर्सची प्रगत शस्त्रे पुरवली आहेत. यामध्ये पॅट्रियट (Patriot) आणि थाड (THAAD) यांसारख्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींचा तसेच पाळत ठेवणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, ही यंत्रणा इराणी हल्ल्यांपासून भक्कम ढाल म्हणून संरक्षण देत आहे.

असे असले तरी, अमेरिकेसमोरील आव्हाने अद्याप संपलेली नाहीत. इराणकडे किनाऱ्यालगतचे भुयारी तळ, जलदगती नौका आणि विनाशकारी सुरुंगांचे मोठे घबाड अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण होर्मुझ पट्टा निर्धोक करण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. इराण आणि इस्रायल (Israel) यांच्यातील संघर्षामुळे जगभरातील तेल, गॅस तसेच हवाई आणि सागरी वाहतुकीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळेच जागतिक ऊर्जा बाजारात स्थिरता आणणे, जहाजांचा प्रवास सुरक्षित करणे आणि या सामुद्रधुनीवरील इराणची पकड कायमची संपवणे हे अमेरिकेचे अंतिम ध्येय आहे.

Join WhatsApp Group

Join Now