सोसायटीच्या लिफ्ट वापरणाऱ्यांनो सावधान! नियमांत मोठा बदल, आता ‘हे’ नियम पाळणे बंधनकारक

On: November 15, 2026 2:52 PM
Housing Society
---Advertisement---

Housing Society Rules | महाराष्ट्रातील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी लिफ्टच्या वापरासंदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. इमारतींमधील लिफ्ट अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवीन सुरक्षा नियमावली लागू केली आहे. 1 नोव्हेंबर 2026 पासून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली असून, लिफ्टची देखभाल, सुरक्षा तपासणी, विमा आणि लहान मुलांच्या वापराबाबत सोसायट्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

जुन्या लिफ्टमध्ये आधुनिक सुरक्षा उपकरणे बसवावी लागणार :

महाराष्ट्र सरकारने गृहनिर्माण संस्थांमधील लिफ्ट आणि एस्केलेटरच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलली आहेत. उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी लिफ्ट हे दैनंदिन जीवनातील आवश्यक साधन बनले आहे. मात्र, गेल्या काही काळात लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड आणि अपघातांच्या घटना समोर आल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन नियमांनुसार, ज्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये जुन्या पद्धतीच्या लिफ्ट कार्यरत आहेत, त्यांना आवश्यक आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवून घ्यावी लागणार आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित बचाव यंत्रणा आणि क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्यास लिफ्टचे काम नियंत्रित करणारे ओव्हरलोड प्रोटेक्शन डिव्हाइस बसवणे आवश्यक आहे. या सर्व सुधारणा पूर्ण करण्यासाठी सरकारने 28 ऑक्टोबर 2027 पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे सोसायटी व्यवस्थापन समित्यांना जुन्या लिफ्टची सद्यस्थिती तपासून आवश्यक उपकरणे बसवण्याचे नियोजन करावे लागणार आहे. निर्धारित मुदतीत सुरक्षा यंत्रणा अद्ययावत करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Housing Society Rules | लहान मुलांच्या लिफ्ट वापरावर निर्बंध; सोसायट्यांची जबाबदारी वाढली :

नवीन नियमावलीमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्याही प्रौढ व्यक्तीशिवाय स्वतंत्रपणे लिफ्टचा वापर करता येणार नाही. अशा मुलांनी लिफ्टमधून प्रवास करताना प्रौढ व्यक्ती सोबत असणे आवश्यक असेल. तसेच स्वतःच्या जबाबदारीवर स्वतंत्रपणे लिफ्ट वापरणाऱ्या व्यक्तीचे वय किमान 18 वर्षे असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय प्रत्येक सोसायटीला लिफ्टची दर महिन्याला सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक असेल. ही देखभाल अधिकृत आणि नोंदणीकृत कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी लागेल. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी मान्यताप्राप्त कंत्राटदारामार्फत लिफ्टचे वार्षिक सुरक्षा ऑडिट करून घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

लिफ्टच्या सुरक्षिततेसाठी थर्ड-पार्टी इन्शुरन्स घेणेही प्रत्येक गृहनिर्माण संस्थेसाठी अनिवार्य असेल. देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांनी नियमांचे पालन केले आहे की नाही, याची खातरजमा करण्याची जबाबदारी सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर असेल. त्यासाठी दरमहा करण्यात आलेली सर्व्हिसिंग, तपासणी आणि देखभालीची संपूर्ण नोंद ठेवावी लागणार आहे. लिफ्टमध्ये अपघात झाल्यास संबंधित घटनेची माहिती 24 तासांच्या आत पोलिसांना देणे आवश्यक असेल. सहा महिन्यांपासून बंद असलेली लिफ्ट पुन्हा सुरू करण्यासाठीही विशेष प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदाराची अधिकृत मंजुरी मिळाल्याशिवाय अशा लिफ्टचा वापर सुरू करता येणार नाही.

News Title: Maharashtra Introduces New Housing Society Lift Rules

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now