EPFO Rules | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) खातेधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बोर्डाने पैसे काढण्यासंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे. यापूर्वी पीएफ खात्यातून रक्कम काढताना किमान 25 टक्के शिल्लक ठेवणे बंधनकारक होते. मात्र, नव्या निर्णयामुळे ही मर्यादा आता 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी कर्मचाऱ्यांना स्वतःचे पैसे अधिक प्रमाणात वापरता येणार आहेत.
पीएफ खात्यातील पैसे काढण्याची मर्यादा वाढली :
आतापर्यंत पीएफ (PF) खात्यातून पैसे काढणाऱ्या सदस्यांना एकूण जमा रकमेपैकी किमान 25 टक्के रक्कम खात्यात शिल्लक ठेवावी लागत होती. म्हणजेच खात्यातील 75 टक्क्यांपेक्षा जास्त पैसे काढण्याची परवानगी नव्हती.
तसेच या अटीमुळे अचानक आर्थिक गरज निर्माण झाल्यासही खातेधारकांना स्वतःच्या बचतीचा संपूर्ण वापर करता येत नव्हता. आताच्या नव्या निर्णयानुसार खात्यात केवळ 10 टक्के रक्कम राखून ठेवली तरी चालणार आहे. परिणामी, पूर्वीच्या तुलनेत आणखी 15 टक्के रक्कम काढण्याची मुभा मिळणार आहे.
EPFO Rules | निवृत्तीनंतर पैसे काढण्यासाठीही नवी सुविधा :
EPFO ने केवळ पैसे काढण्याच्या मर्यादेत बदल केलेला नाही, तर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा मंजूर केली आहे. सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन या योजनेमुळे निवृत्तीनंतर पीएफमधील संपूर्ण जमा रक्कम एकाच वेळी काढण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याऐवजी खातेधारकांना ठरावीक कालावधीनुसार किंवा टप्प्याटप्प्याने पैसे काढता येतील. त्यामुळे निवृत्तीनंतरही आर्थिक नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे.
या सुविधेचा फायदा असा की, गरजेनुसार काही रक्कम वापरता येईल आणि उर्वरित बचत पीएफ खात्यात कायम राहू शकेल. शिल्लक रकमेवर नियमानुसार व्याज मिळत राहिल्याने भविष्यातील आर्थिक गरजांसाठीही पैसे उपलब्ध राहू शकतात. अनेक कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी मोठी रक्कम कशी वापरायची, याबाबत प्रश्न पडतो. काही जण सर्व पैसे एकदम खर्च करतात, तर काहींना नियमित उत्पन्नाची गरज असते. अशा परिस्थितीत टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.
दरम्यान, नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला पीएफसाठी काही रक्कम कपात केली जाते आणि ती त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होते. कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या योगदानातून ही बचत तयार होत असते. कालांतराने त्यावर व्याज जमा होऊन मोठी रक्कम उभी राहते. त्यामुळे गरजेच्या वेळी अधिक पैसे काढण्याची मुभा आणि निवृत्तीनंतर नियोजनबद्ध पद्धतीने रक्कम वापरण्याचा पर्याय हे दोन्ही निर्णय पीएफ सदस्यांसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.








