UPI EMI Facility | डिजिटल व्यवहारात क्रांती घडवणाऱ्या UPI (Unified Payments Interface) मध्ये आणखी एक मोठा बदल होत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जाहीर केले आहे की, आता UPI वर EMI (Equated Monthly Installment) ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजेच ग्राहक QR कोड स्कॅन करून खरेदी करतील आणि त्याच पेमेंटला थेट मासिक हप्त्यांमध्ये रूपांतरित करू शकतील. (UPI EMI Facility)
कशी काम करेल ही सुविधा? :
आजवर क्रेडिट कार्ड वापरताना खरेदी EMI मध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय मिळत होता. अगदी तशीच सोय आता UPI पेमेंट्समध्ये मिळणार आहे.
ग्राहक QR कोड स्कॅन करून पेमेंट करतील. त्यानंतर पेमेंटच्या वेळीच ‘EMI मध्ये भरा’ हा पर्याय दिसेल. ठराविक कालावधीसाठी मासिक हप्त्यांमध्ये रक्कम भरता येईल.
NPCI फिनटेक कंपन्यांना त्यांच्या ॲप्समध्ये हे फीचर जोडण्याची परवानगी देणार आहे. त्यामुळे Google Pay, PhonePe, Paytm, Navi यांसारख्या ॲप्सवरून ही सुविधा मिळू शकते.
UPI EMI Facility | EMI सुविधेची गरज का भासली? :
UPI आधीच भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पेमेंट पद्धती बनली आहे. रुपे क्रेडिट कार्ड्स आणि UPI क्रेडिट लाईनच्या यशामुळे आता पुढचे पाऊल EMI सुविधेच्या रूपाने उचलले जात आहे.
एकाच वेळी मोठी रक्कम भरण्याऐवजी EMI मध्ये सोयीस्कर पेमेंट करता येईल. मात्र याचा व्यवसायांना फायदा होईल, कारण ग्राहकांची खरेदी क्षमता वाढेल.
फिनटेक कंपन्यांची भूमिका आणि फायदा :
या फीचरमुळे फिनटेक कंपन्यांसाठी नवीन महसूलाचे मार्ग खुला होतील. NPCI ने UPI वरील क्रेडिट लाईनवर 1.5% इंटरचेंज फी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँका आणि फिनटेक्सना फायदा होईल.
‘नवी’ (Navi) चे सीईओ राजीव नरेश यांनी सांगितले की, लवकरच त्यांच्या ॲप्समध्ये ही सुविधा जोडली जाणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना QR स्कॅन करतानाच EMI पर्याय निवडता येईल.






