गुलशन कुमार हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम यांचा मोठा खुलासा; हत्येमागील कारणही सांगितलं

On: October 23, 2025 12:37 PM
Ujjwal Nikam
---Advertisement---

Ujjwal Nikam | टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येने एकेकाळी संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. आता या प्रकरणावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी एका मुलाखतीत भाष्य केले असून, संगीत दिग्दर्शक नदीम सैफीच्या भूमिकेवर थेट बोट ठेवले आहे. त्यांच्या या खुलाशामुळे जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

निकम यांचा दावा

प्रसिद्ध युट्यूबर शुभांकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत उज्ज्वल निकम यांना गुलशन कुमार हत्येमागील कारण, माफिया कनेक्शन आणि नदीम सैफीच्या (Nadeem Saifi) सहभागाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. नदीम सैफी हत्येचा सूत्रधार होता का? या प्रश्नावर निकम म्हणाले, “तोच होता ना? तो या हत्येमागे होता, म्हणूनच तर तो न्यायालयीन सुनावणीला हजर राहात नाही.”

निकम यांनी पुढे स्पष्ट केले की, न्यायालयाने अनेकदा समन्स बजावूनही नदीम सैफी आजपर्यंत सुनावणीला सामोरा गेलेला नाही. “नदीम आजही परदेशात राहून गाणी तयार करतो आणि ती भारतात प्रदर्शित होतात, हे आम्हाला माहीत आहे. त्याला भारतात परतायचे आहे आणि त्याने तसे प्रस्तावही पाठवले आहेत. पण आमची अट स्पष्ट आहे – आधी न्यायालयीन सुनावणीला हजर राहा, कबुलीजबाब नोंदव. पण त्याला न्यायालयासमोर यायचे नाही,” असे निकम यांनी सांगितले.

Ujjwal Nikam | हत्येमागील कारण

या हत्येमागील नेमके कारण काय होते, यावर बोलताना निकम यांनी बॉलिवूडमधील अंतर्गत स्पर्धेकडे इशारा केला. ते म्हणाले, “अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) या संगीत दिग्दर्शकाची (गुलशन कुमार) गायिका, तर अलका याज्ञिक (Alka Yagnik) त्या संगीत दिग्दर्शकाची (नदीम सैफी) गायिका, असा सगळा वाद होता.”

पोलिसांच्या तपासानुसार नदीम हाच हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचे संबंध पूर्वी लोकांना फारसे माहीत नव्हते, परंतु १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतर हे भयाण वास्तव समोर आले आणि सगळे खडबडून जागे झाले. गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी अंधेरीतील एका मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अब्दुल रौफ मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

 News Title- Ujjwal Nikam Links Nadeem Saifi to Gulshan Murder

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now