Uddhav Thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले असताना त्यांना मोठा धक्का बसला आहे. कोकणातील ज्येष्ठ शिवसेना नेते आणि माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला असून, ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
राजन साळवी यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित
राजन साळवी यांनी शिवसेना भवनात आपला राजीनामा सादर केला असून, उद्या ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीतील उत्साहानंतर विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील शिवसेनेचे निष्ठावान नेते समजले जाणारे राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजीनाम्याचे प्रमुख कारण काय?
राजन साळवी यांच्यावर काही काळापूर्वी ईडीची चौकशी सुरू झाली होती, मात्र त्यांनी संघर्ष करण्याचा मार्ग स्वीकारला. परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने ते नाराज होते. तसेच, त्यांचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्याशी मतभेद होते, यामुळेही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
कोकणातील मोठा प्रभाव असलेले नेते
राजन साळवी यांनी कोकणात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजवली होती. ते तीन वेळा राजापूर (Rajapur) मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.
मात्र, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजप सत्ता आल्यापासून ईडीची कारवाई सुरू झाली, आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर पक्षातील काही नेत्यांनी विरोधात काम केल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. त्यामुळेच अखेर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा मार्ग मोकळा केला. (Uddhav Thackeray)
राजन साळवी यांच्या पक्षांतरामुळे कोकणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Title : Uddhav Thackeray Shiv Sena Leader Rajan Salvi Resigns






