पुण्यात FDA ची धडक कारवाई; 12 प्रसिद्ध रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

On: August 11, 2026 11:25 AM
Pune FDA Action (1)
---Advertisement---

Pune FDA Action | पुणे विभागातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि इतर खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी तपासणी मोहीम राबवली. अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि नियमबाह्य साठवणुकीसारख्या बाबी समोर आल्यानंतर 12 प्रतिष्ठानांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली. या कारवाईसोबत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित खाद्यसाठाही जप्त करण्यात आला आहे.

पुणे विभागात 19 प्रतिष्ठानांवर कारवाई :

अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) पुणे विभागातील विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी तसेच अन्य खाद्य व्यवसायांचा या मोहिमेत समावेश होता. 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रशासनाने तब्बल 19 प्रतिष्ठानांविरोधात कारवाई केली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे, परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याचे तसेच खाद्यपदार्थांची नियमबाह्य पद्धतीने साठवणूक केल्याचे आढळून आले.

या कारवाईत तब्बल 41.38 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित खाद्यसाठा प्रशासनाने जप्त केला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकरणांमध्ये 24 जणांना अटक करण्यात आली असून, 14 प्रतिष्ठानांना सील करण्यात आले आहे. याशिवाय कारवाईदरम्यान चार वाहनेही जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या निर्मितीपासून ते विक्रीपर्यंत स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Pune FDA Action | 12 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित :

तपासणीमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 12 हॉटेल आणि रेस्टॉरंटसह खाद्य प्रतिष्ठानांवर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले. संबंधित व्यवसायांचे लायसन्स अथवा नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. खाद्यपदार्थ तयार करताना परिसराची स्वच्छता राखणे, अन्न योग्य तापमानात ठेवणे, मुदत संपलेल्या वस्तूंचा वापर टाळणे आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे व्यावसायिकांसाठी आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भविष्यातही कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी कोंढवा (Kondhwa) परिसरातही FDA च्या तपासणीदरम्यान मोठा खाद्यसाठा आढळला. कोंढवा येथील कर्णी पार्किंगमध्ये एका बसची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 598 किलो गोड मावा सापडला. या माव्याची वाहतूक करताना आवश्यक तापमान नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. शिवाय, या खाद्यपदार्थासाठी आवश्यक खाद्य परवाना नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. माव्याच्या लेबलवर आवश्यक माहिती देण्यातही त्रुटी असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे :

नियमांचे हे उल्लंघन लक्षात घेऊन FDA ने सुमारे 1 लाख 49 हजार 500 रुपये किमतीचा मिठा मावा जप्त केला. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ किंवा अस्वच्छता आढळल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छतेसह अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तसेच ग्राहकांनाही खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा एखाद्या प्रतिष्ठानातील स्वच्छतेबाबत संशय असल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी 1800222365 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

News Title: Pune FDA Cracks Down on Food Outlets

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now