IMD Weather Alert | देशातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, आता भारतीय हवामान विभागाने (IMD) 17 राज्यांसाठी पुढील 24 तासांचा पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत अतिमुसळधार पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पावसाची स्थिती मात्र तुलनेने वेगळी असून पुढील काही दिवसांचा अंदाजही समोर आला आहे.
17 राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार :
यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला अल् निनोचा (El Nino) प्रभाव पावसावर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली होती. त्यानुसार देशातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. मात्र, मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये पावसाने जोर पकडला आहे. काही ठिकाणी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, हवामानातील बदलामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता पुढील 24 तासांतही अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
दिल्ली (Delhi), उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय (Meghalaya), नागालँड (Nagaland), मणिपूर (Manipur), मिझोरम (Mizoram) आणि त्रिपुरा (Tripura) या 17 राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. काही भागांमध्ये पावसासोबत वादळी वारेही वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
IMD Weather Alert | महाराष्ट्रात पाऊस ओसरणार :
महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता कमी असून, तुरळक भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. यंदाच्या पावसात राज्यभर मोठी तफावत दिसून आली आहे. काही भागांत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असताना, काही जिल्ह्यांना अपेक्षित पर्जन्यमान मिळालेले नाही. विशेषतः सोलापूर (Solapur) जिल्ह्यात पावसाची सर्वाधिक कमतरता नोंदवण्यात आली असून, येथे तब्बल 33 टक्के पावसाची तूट असल्याचे सांगण्यात आले आहे.
मराठवाड्यातही अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नसल्याने पावसाची कमतरता कायम आहे. याउलट कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागात यंदा तुलनेने सर्वाधिक पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचे वितरण एकसमान राहिलेले नाही. हवामान तज्ज्ञ एस.डी. सानप यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील पाच दिवस सर्वदूर पावसाची शक्यता कमी राहील. मात्र, पुढील दोन महिन्यांमध्ये राज्यात सरासरी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या काही भागांमध्ये पावसाची तूट असली, तरी आगामी काळात त्यात काही प्रमाणात भर पडण्याची शक्यता आहे.






