भारतीय संघात मोठा बदल! साई सुदर्शनच्या जागी ‘या’ स्टार खेळाडूला संधी

On: August 10, 2026 5:46 PM
Sarfaraz Khan
---Advertisement---

Sarfaraz Khan | भारत आणि श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे साई सुदर्शन (Sai Sudharsan) मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी सरफराज खान (Sarfaraz Khan) याचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडिया पोस्टद्वारे या बदलाची अधिकृत माहिती दिली आहे.

दुखापतीमुळे साई सुदर्शन संघाबाहेर :

साई सुदर्शनच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो सहभागी होऊ शकणार नाही. सध्या बंगळुरू (Bengaluru) येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुखापतीतून सावरण्याची त्याची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने सुरू असून बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. त्याची रिकव्हरी योग्य दिशेने होत असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

साई सुदर्शनच्या अनुपस्थितीत निवड समितीने सरफराज खानची निवड केली आहे. 15 ऑगस्टला गाले (Galle) येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघ रवाना होणार आहे. त्याआधी सरफराज कोलंबो येथे संघासोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे दीर्घ काळानंतर त्याला पुन्हा भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले आहे. सरफराजने नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आतापर्यंत त्याने भारतासाठी 6 कसोटी सामने खेळले असून 11 डावांमध्ये 37 च्या सरासरीने 371 धावा जमा केल्या आहेत.

Sarfaraz Khan | प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार? :

संघात पुनरागमन झाले असले तरी सरफराजला थेट अंतिम अकरामध्ये संधी मिळेलच, अशी शक्यता सध्या स्पष्ट नाही. देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून सराव सामन्यात त्याने शतक झळकावले आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याला पसंती मिळू शकते. अशा परिस्थितीत सरफराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी 15 ते 19 ऑगस्टदरम्यान गाले येथे होणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 23 ते 27 ऑगस्टदरम्यान कोलंबोमध्ये खेळवला जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत भारतासाठी या मालिकेतील गुण महत्त्वाचे आहेत. मात्र, त्याचवेळी संघातील प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे कर्णधार शुभमन गिल याच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा हे खेळाडूही दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.

भारतीय संघात शुभमन गिल कर्णधार, तर केएल राहुल (KL Rahul) उपकर्णधार आहे. यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांचाही संघात समावेश आहे. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल हे यष्टीरक्षक आहेत. याशिवाय रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी (Aaqib Nabi) आणि आता सरफराज खान यांचा समावेश करण्यात आला आहे.

News title : Sarfaraz Khan Replaces Sai Sudharsan

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now