Pune Railway News | पुणे शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील (Pune Railway Station) वाढत्या गर्दीचा आणि ताणाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी भारतीय रेल्वेने हडपसर रेल्वे टर्मिनलला पर्यायी केंद्र म्हणून विकसित करण्याचे पाऊल उचलले असून, आता त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
या टर्मिनलचे काम 90 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून प्रवासी सुविधा, प्लॅटफॉर्म विस्तार, पार्किंग क्षेत्र, वाहतूक व्यवस्थापन आदी अनेक सोयी-सुविधांची उभारणी वेगाने सुरू आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत पुणे स्टेशनवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे मानले जात आहे. सध्या हडपसरवरून 12 नियमित व विशेष गाड्या धावत असून, 10 गाड्यांना येथील थांबा मंजूर आहे.
हडपसर टर्मिनलवरून दोन महत्त्वाच्या गाड्यांचा श्रीगणेशा :
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 26 जानेवारी 2026 पासून दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांचे प्रस्थान पुणे रेल्वे स्थानकावरून न घेता हडपसर रेल्वे टर्मिनल वरून होणार आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही गाड्या सध्या प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून, या बदलामुळे केवळ पुणे स्थानकावरील गर्दी कमी होणार नाही तर पूर्वेकडील भागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
या गाड्यांमध्ये नांदेड एक्स्प्रेस आणि हरंगुल स्पेशल (Harngul special) यांचा समावेश आहे. पुणे स्थानकाच्या सुरू असलेल्या रिमॉडेलिंग कामामुळे टप्प्याटप्प्याने काही गाड्या हडपसर आणि खडकीकडे वळविण्याची योजना रेल्वे प्रशासनाने आखली आहे. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून या दोन महत्त्वाच्या गाड्या आता हडपसरहून सुटणार आहेत.
Pune Railway News | कसे असणार नवे वेळापत्रक? :
हडपसर–हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस (Nanded express) दररोज रात्री 9.50 वाजता प्रस्थान करणार असून, परतीची हजूर साहिब नांदेड–हडपसर एक्स्प्रेस पहाटे 4.35 वाजता येणार आहे. तसेच हडपसर–हरंगुल स्पेशल दररोज सकाळी 6.20 वाजता सुटणार आहे, तर हरंगुल–हडपसर स्पेशलचे आगमन रात्री 8.45 वाजता होणार आहे.
या बदलांमुळे हडपसर परिसरातील तसेच पुणे शहराच्या पूर्व भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शहरातील वाहतुकीवरचा ताणही कमी होणार असल्याने हा निर्णय निश्चितच दूरदृष्टीने केलेला आहे.






