Turmeric Trend | सोशल मीडियावर रोज नवनवीन ट्रेंड्स येत असतात आणि ‘घिबली’ ट्रेंडनंतर आता ‘टर्मरिक ग्लो’ (Turmeric Glow Trend) नावाचा एक नवीन ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेकजण हा ट्रेंड फॉलो करत याचे व्हिडिओ बनवत आहेत. मात्र, या ट्रेंडसाठी वापरलेले हळदीचे पाणी अनेकजण फेकून देतात, जे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरू शकते.
काय आहे ‘टर्मरिक ग्लो’ ट्रेंड?
हा ट्रेंड अतिशय साधा आणि सोपा आहे. यामध्ये, घरातील दिवे बंद करून अंधार केला जातो. त्यानंतर, मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरू करून त्यावर पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवला जातो. या पाण्यात चमचाभर हळद (Haldi) टाकल्यावर ती हळूहळू ग्लासच्या तळाशी जाताना एक सुंदर पिवळा प्रकाश निर्माण करते, जो संपूर्ण खोलीत पसरतो.
या ट्रेंडसाठी लागणारे साहित्य घरात सहज उपलब्ध असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. अनेकजण केवळ व्हिडिओ बनवून हे हळदीचे पाणी फेकून देतात. परंतु औषधी गुणधर्मांनी युक्त असलेले हे पाणी फेकून न देता त्याचा अनेक चांगल्या कामांसाठी वापर केला जाऊ शकतो.
हळदीच्या पाण्याचा औषधी पुनर्वापर-
ट्रेंडनंतर उरलेल्या हळदीच्या पाण्याचा उपयोग तुम्ही त्वचेसाठी फेस्टोनर म्हणून करू शकता. कापसाच्या बोळ्याने हे पाणी चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि मुरुमे, डाग कमी होतात. याच पाण्यात बेसन किंवा मुलतानी माती मिसळून तुम्ही एक प्रभावी फेसपॅक देखील तयार करू शकता. याशिवाय, घरातील पितळेची भांडी किंवा शोभेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठीही हे पाणी उपयुक्त आहे, ज्यामुळे वस्तूंना नवी चकाकी येते.
या पाण्याचा उपयोग तुम्ही इतर अनेक कामांसाठीही करू शकता. एक ग्लास हळदीचे पाणी पाच लिटर पाण्यात मिसळून बागेतील रोपांना घातल्यास त्यांची वाढ चांगली होते. रोजच्या जेवणात डाळ शिजवताना हे पाणी वापरता येते. तसेच, हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने, हे पाणी माऊथ वॉश म्हणून वापरल्यास तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांच्या समस्या दूर होतात. अंघोळीच्या पाण्यात मिसळल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचा मऊ होते.






