Tuljapur | धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील तुळजापूर (Tuljapur) हे तुळजाभवानी देवीच्या मंदिरासाठी ओळखले जाते. मात्र, श्रद्धेचा हा परिसर सध्या एका धक्कादायक गुन्ह्यामुळे चर्चेत आहे. पोलिसांनी येथे ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून या प्रकरणात एकूण 35 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी तब्बल 13 आरोपी हे देवीच्या मंदिरात पुजारी म्हणून काम करत असल्याचं उघडकीस आलं आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे 14 फेब्रुवारी 2025 रोजी ड्रग्जच्या साठ्यासह तिघांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत 45 ग्रॅम एमडी ड्रग्जच्या 59 पुड्या सापडल्या होत्या. त्यानंतर मुंबईच्या संगीता गोळे हिला 22 फेब्रुवारीला अटक केली गेली. तिच्याकडून पाच कोटींचे व्यवहार व सोनं जप्त करण्यात आलं.
पुढच्या तपासात सोलापूर, पुणे व इतर भागांतून आणखी अटकसत्र राबवले गेले. 25 मार्चपर्यंत आरोपींची संख्या वाढत गेली आणि अटक करण्यात आलेल्यांची संख्या 14 झाली, तर 21 आरोपी अजूनही फरार आहेत.
माजी नगराध्यक्ष ते मंदिरातील पुजारी
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आणि फरार आरोपींमध्ये माजी नगराध्यक्ष, माजी सभापती, राजकीय नेते आणि स्थानिक गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांचा समावेश आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे 13 आरोपी हे तुळजाभवानी मंदिरात पुजारी होते. यामुळे धार्मिक संस्थांची प्रतिमा डागळली गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मंदिर प्रशासनाने तात्काळ यामध्ये सहभागी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली असून, पूजा करणाऱ्या अधिकृत पुजाऱ्यांची बदनामी थांबवावी, अशी मागणी पुजारी मंडळाने केली आहे.
ड्रग्ज रॅकेटचा तपास अजूनही सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीच्या नेटवर्कचा विस्तार केवळ धाराशिवपुरताच मर्यादित नाही, तर मुंबई, पुणे, सोलापूरसारख्या शहरांपर्यंत आहे. स्थानिक राजकीय व्यक्तींचा सहभाग आणि माजी नगराध्यक्षांच्या वाहनांचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ पोलिस कारवाईपुरते मर्यादित न राहता, राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे.
Title : Tuljapur Drug Racket 13 Priests Named






