Gold Silver Price | मंगळवारी रात्री सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी उलथापालथ झाली. देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींचा परिणाम म्हणून या मौल्यवान धातूंच्या दरात तीव्र घसरण झाली. मात्र बुधवारी सकाळी बाजार सुरू होताच दरात सुधारणा दिसून आली. त्यामुळे ग्राहकांनी ज्वेलरकडे जाण्यापूर्वी ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे ठरत आहे.
रात्रीची घसरण; चांदीत मोठी पडझड :
मंगळवारी सायंकाळनंतर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange – MCX) वर सोनं आणि चांदीच्या दरात अचानक घसरण झाली. विशेषतः चांदीने मोठी घसरण नोंदवली. रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास चांदीचे दर 5 टक्क्यांहून अधिक खाली आले. व्यवहारादरम्यान चांदीचा दर प्रति किलो सुमारे 2.26 लाख रुपयांच्या आसपास पोहोचला होता. 5 मार्च एक्सपायरी असलेल्या चांदीच्या करारात 5.58 टक्के म्हणजेच 13,278 रुपयांची घसरण होऊन किंमत 2,26,513 रुपये प्रति किलोवर आली. (Today Gold Silver Price)
याआधी 29 जानेवारी रोजी चांदीने 4,20,048 रुपये प्रति किलो असा उच्चांक गाठला होता. त्या उच्चांकी पातळीपासून पाहता चांदीचा दर 1,93,535 रुपयांनी खाली आला आहे. मात्र मंगळवारी व्यवहार संपताना चांदी पुन्हा सावरत 2,28,783 रुपयांवर बंद झाली. त्यामुळे रात्री झालेली मोठी पडझड काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.
Gold Silver Price | सकाळी उसळी; सोन्यातही सुधारणा :
रात्रीच्या घसरणीनंतर बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बाजार उघडताच दरात वाढ दिसून आली. सकाळच्या सत्रात चांदीचा दर 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह 5,000 रुपयांपेक्षा जास्त उसळी घेत सुमारे 2,34,000 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा हालचाल वाढल्याचे चित्र दिसले.
सोन्याच्या बाबतीतही अशीच स्थिती दिसली. मंगळवारी रात्री सुमारे 2.5 टक्क्यांनी घसरल्यानंतर बुधवारी सकाळी सोन्यानेही रिकव्हरी दाखवली. फ्युचर्स ट्रेडिंगच्या शेवटी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम दर 1,51,418 रुपयांवर बंद झाला होता. 2 एप्रिल एक्सपायरी असलेल्या या करारात बुधवारी सकाळी सुमारे 1.15 टक्क्यांची वाढ नोंदवत दर 1,53,165 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला. (Today Gold Silver Price)
29 जानेवारी रोजी सोन्याने 1,93,096 रुपये प्रति 10 ग्रॅम असा उच्चांक गाठला होता. त्यानंतर दरात सातत्याने घसरण सुरू झाली. मधूनमधून किरकोळ वाढ झाली असली तरी सध्याचा दर हा त्या उच्चांकापेक्षा सुमारे 40 हजार रुपयांनी कमी आहे. त्यामुळे बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरत आहे.






