TMKOC |‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही हिंदी मालिकेतील एक दीर्घकाळ चाललेली आणि लोकप्रिय मालिका असून, गेली तब्बल १७ वर्षे ती प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. विशेषतः ‘दयाबेन’ हे पात्र अनेकांना आजही तितकंच प्रिय आहे. आता या भूमिकेच्या पुनरागमनाची चिन्हं दिसू लागली आहेत.
दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन्स?
मालिकेतील (TMKOC) ‘दयाबेन’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने २०१७ मध्ये मातृत्वासाठी ब्रेक घेतला होता. तिने घेतलेला हा अल्पकालीन ब्रेक अखेर इतका लांबला की आठ वर्षांनीही ती परतली नाही. या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून सतत विचारणा होत होती की, “दयाबेन परत कधी येणार?” अखेर याचे उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलत असताना, निर्माता असितकुमार मोदी (Asit Kumar Modi) यांनी अखेर नवीन दयाबेनसाठी ऑडिशन्स घेऊन एका अभिनेत्रीलाच फायनल (TMKOC) केलं आहे. अद्याप तिचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र संबंधित अभिनेत्रीबरोबर मॉक शूटिंगही सुरू झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापासून हे मॉक शूटिंग सुरु असून ती अभिनेत्री असितजींना खूपच भावली आहे. त्यामुळे लवकरच मालिकेत ‘नवीन दयाबेन’ दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिशा वकानीसह इतर कलाकारांची एक्झिट-
दिशा वकानीने (Disha Vakani) २०१७ मध्ये मालिका सोडली आणि तिला परत आणण्यासाठी टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र तिने खासगी आयुष्याला प्राधान्य दिलं आणि परतण्यास नकार दिला. फक्त दिशा नव्हे, तर याच कालावधीत अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला. टप्पू साकारणारा राज अनाडकत, गोलीची भूमिका करणारा कुश शाह, तारक मेहता साकारणारे शैलेश लोढा, सोनू साकारणारी झील मेहता हे कलाकार आता मालिकेत दिसत नाहीत.
तरीही, या मालिकेतील पात्रं जुनी असोत की नवी, त्यांची जागा प्रेक्षकांच्या मनात कायम राहिलेली आहे. त्यामुळेच दयाबेनच्या भूमिकेसाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि आता ती उत्सुकता लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.






