Thane Cut | ठाणे (Thane) महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने 20 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 18 जूनपासून काही भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, त्यानंतरही काही दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.
18 जूनपासून 24 तास पाणीपुरवठा बंद :
अल निनो (El Niño) प्रभावामुळे यंदा पावसाळा उशिरा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी 9 जून रोजी जलसंपदा विभागासोबत झालेल्या आढावा बैठकीत 20 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Maharashtra Industrial Development Corporation – MIDC) जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार, 18 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवार, 19 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत दिवा प्रभाग समिती आणि कळवा प्रभाग समितीतील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहील. तसेच मुंब्रा प्रभाग समितीतील बहुतांश भागांमध्ये, प्रभाग क्रमांक 26 आणि 31 मधील काही क्षेत्रे वगळता, पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
Thane Water Cut | ‘या’ भागांना बसणार फटका :
वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक 2 आणि नेहरूनगर या परिसरांनाही पाणीकपातीचा परिणाम जाणवणार आहे. मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव या भागातही 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation – TMC) दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी दुपारी 12 वाजता पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही तांत्रिक कारणांमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






