Arbaz Shaikh | सैराट (Sairat) चित्रपटातील ‘सल्या’ ही भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता अरबाज शेख (Arbaz Shaikh) याच्यावर मोठे दुःख कोसळले आहे. त्याचे वडील अस्लम शेख (Aslam Shaikh) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर मेंदूशी संबंधित आजारासाठी उपचार सुरू होते. या घटनेमुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली असून चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
महिनाभर उपचार सुरू, अखेर मृत्यूशी झुंज हरली :
मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम शेख यांच्यावर सुरुवातीला सोलापूर (Solapur) येथील एका खासगी रुग्णालयात मेंदूविषयक आजारावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने गेल्या महिनाभरापासून डॉक्टरांकडून सातत्याने उपचार करण्यात येत होते. वडिलांना वाचवण्यासाठी अरबाज शेख प्रत्येक स्तरावर प्रयत्न करत होता. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक ती धडपड करत असतानाच त्याने सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओही शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये “मला माझ्या वडिलांना वाचवायचं आहे” असे म्हणत तो अश्रूंना वाट मोकळी करून देताना दिसला होता.
या भावनिक आवाहनानंतर चाहत्यांनीही त्याला मोठा पाठिंबा दिला होता. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न आणि उपचार सुरू असतानाही अस्लम शेख यांची प्रकृती सुधारू शकली नाही. अखेर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे अरबाज आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
Arbaz Shaikh | रुग्णालयावर आरोप, नंतर मिळाली मदत :
काही दिवसांपूर्वी अरबाज शेखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्याने संबंधित खासगी रुग्णालयावर उपचारासाठी वारंवार अधिक पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. हा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) संबंधित रुग्णालयाच्या मेडिकलवर कारवाई केली होती. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती.
यानंतर शिवसेना (Shivsena) (शिंदे गट) यांनीही या प्रकरणाची दखल घेत अरबाज शेख आणि त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. त्यानंतर अस्लम शेख यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवून पुढील उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी प्रकृती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र ते निष्फळ ठरले. ‘सैराट’ चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेला अरबाज सध्या विविध माध्यमांत सक्रिय आहे. काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या प्रेयसीसोबत विवाह केला होता आणि लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. वैवाहिक आयुष्य आनंदात सुरू असतानाच आता वडिलांच्या निधनामुळे त्याच्या डोक्यावरचे वडिलांचे मायेचे छत्र कायमचे हरपले आहे.






