UPI युजर्ससाठी मोठा बदल! आता ‘हा’ महत्त्वाचा नियम लागू होणार

On: July 30, 2026 7:16 PM
UPI Privacy Rules
---Advertisement---

UPI Privacy Rules | डिजिटल पेमेंट करणाऱ्या नागरिकांसाठी मोठा बदल लागू होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने Google Pay, PhonePe, Paytm आणि इतर UPI सेवा पुरवठादार तसेच भागीदार बँकांना नव्या गोपनीयता नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे व्यवहारादरम्यान वापरकर्त्यांचा मोबाईल क्रमांक आणि वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित राहणार असून, संबंधित संस्थांना 4 सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

मोबाईल नंबर लपवण्याचा नवा निर्णय :

डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) नियमांचा आधार घेत एनपीसीआयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या निर्देशांनुसार, यूपीआय व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांचा संपूर्ण मोबाईल क्रमांक किंवा इतर संवेदनशील वैयक्तिक माहिती समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही. यामुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये गोपनीयतेचे संरक्षण अधिक मजबूत होणार आहे.

याआधीही एनपीसीआयने यासंदर्भात परिपत्रक जारी करून मोबाईल क्रमांक लपवण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर याबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा, ओळखीचा आणि वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, ग्राहकांना दिसणाऱ्या प्रत्येक इंटरफेसमध्ये यूपीआय आयडी, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याशी संबंधित माहिती सुरक्षित पद्धतीने लपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. क्यूआर कोडद्वारे पेमेंट करताना मोबाईल क्रमांकातील फक्त शेवटचे चार अंकच दिसतील, तर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तो क्रमांक पूर्णपणे लपवला जाईल.

UPI Privacy Rules | UPI आयडीसाठी नवीन पर्याय उपलब्ध :

एनपीसीआयने आपल्या आदेशात यूपीआय सेवा देणाऱ्या सर्व अॅप्सना मोबाईल क्रमांकाऐवजी स्वतंत्र युझरनेमवर आधारित यूपीआय आयडी तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासही सांगितले आहे. सध्या बहुतांश ग्राहक मोबाईल क्रमांकालाच यूपीआय आयडी म्हणून वापरतात, कारण वेगळा युझरनेम तयार करण्याची सुविधा किंवा त्याची माहिती अनेकांना नसते.

या बदलांमुळे भविष्यात वापरकर्त्यांचा मोबाईल क्रमांक अनोळखी व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा धोका कमी होईल. त्यामुळे अनावश्यक कॉल किंवा संदेशांपासूनही संरक्षण मिळू शकते. याशिवाय, गेल्या महिन्यात यूपीआय संदर्भातील आणखी एका प्रस्तावाची माहिती समोर आली होती. त्यानुसार, एनपीसीआय अशा नव्या फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे सर्व ऑटोमॅटिक पेमेंट्सची माहिती एका ठिकाणी पाहता येईल. या सुविधेमुळे ग्राहकांना विविध अॅप्सवरील ऑटो-पे व्यवहार एकाच यूपीआय अॅपमध्ये पाहता येतील आणि बँकांनाही त्याचे व्यवस्थापन अधिक सोपे होणार आहे.

News Title: UPI Privacy Rules Strengthened

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now