TET परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी! मार्गदर्शक सूचना जाहीर

On: November 21, 2025 4:54 PM
Maharashtra TET 2025
---Advertisement---

TET Exam 2025 | राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अवघ्या काही दिवसांवर आली असून यंदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी नोंदणी केली आहे. आगामी 23 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा राज्यातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे या परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. (TET Exam 2025)

पेपर 1 साठी 2,03,333 आणि पेपर 2 साठी 2,72,335 उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यामुळे एकूण 4 लाख 75 हजार 668 उमेदवार परीक्षा देणार असून हा आतापर्यंतचा विक्रमी सहभाग आहे. यंदा परीक्षेमध्ये सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

चेहरा ओळख प्रणाली आणि प्रवेश प्रक्रिया :

उमेदवारांची ओळख पडताळणी करण्यासाठी परीक्षा केंद्रांवर फेस रेकग्निशन सिस्टम लागू करण्यात आली आहे. उमेदवाराची माहिती, अर्जावरील फोटो आणि प्रत्यक्ष व्यक्तीचे चेहरे यामधील जुळणारे घटक तपासले जातील. जर चेहरा ओळख प्रणालीमध्ये विसंगती आढळली तर उमेदवाराला लगेच बाहेर काढले जाणार नाही, तर केंद्र प्रमुख ओळखपत्र, प्रवेशपत्र आणि प्रत्यक्ष चेहरा यांची तुलना करून अंतिम निर्णय घेतील. (TET Exam 2025)

जर मूळ उमेदवाराऐवजी दुसरी व्यक्ती परीक्षा देण्यासाठी आल्याचे सिद्ध झाले, तर संबंधितांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. यासाठी फोटो व्यू, कनेक्ट व्यू आणि AI आधारित सुरक्षा व्यवस्था वापरली जाणार आहे. तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करून फक्त अधिकृत सूचनांवर अवलंबून राहण्याचे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.

TET Exam 2025 | केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था :

राज्यातील एकूण 1,420 परीक्षा केंद्रांवर उच्चस्तरीय सुरक्षा प्रणाली बसवण्यात आली आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक तपासणीचा समावेश आहे. सर्व उमेदवारांची प्रवेशापूर्वी मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार असून मोबाइल, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर आणि सर्व इलेक्ट्रॉनिक साधनांवर बंदी असेल.

परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की या तंत्रज्ञानाच्या मदतीने पेपर फुटणे, बोगस उमेदवार आणि कॉपी करण्यासारख्या प्रकारांना पूर्णविराम देण्याचा उद्देश आहे. पारदर्शक, सुरक्षित आणि निष्पक्ष परीक्षा घडवून आणण्याचा आत्मविश्वासही परिषदेनं व्यक्त केला आहे.

जिल्हानिहाय उमेदवारांची संख्या :

यंदाच्या परीक्षेमध्ये सर्वाधिक नोंदणी पुणे, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यांतून झाली आहे. पुण्यातून 37,293, नाशिकमधून 32,031 आणि नांदेडमधून 26,137 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर (24,200) आणि अहिल्यानगर (22,850) जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. तर सर्वात कमी नोंदणी सिंधुदुर्ग (2,423) आणि रत्नागिरी (4,351) जिल्ह्यांतून झाली आहे.

News Title: TET Exam 2025: What Happens If Face Recognition Fails at Exam Center? Full Details by Maharashtra Exam Council

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now