Terror Alert in Kashmir l जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam attack)अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर, संपूर्ण काश्मीरमध्ये नव्याने अतिरेकी हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेचे मॉड्युल पर्यटनस्थळांवर मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली असून, दोन अण्वस्त्रधारी देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर, काश्मीरमध्ये पर्यटनस्थळांवर विशेष लक्ष देऊन सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ :
दक्षिण काश्मीरमधील विविध पर्यटनस्थळांना संभाव्य लक्ष्य करण्यात आले असून, भारतीय सेना आणि निमलष्करी दलांनी कडक सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Terror Alert in Kashmir)
गुप्तचर खात्याच्या माहितीनुसार, अतिरेकी गट पर्यटनस्थळांसोबतच अल्पसंख्याक काश्मिरी पंडित आणि सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सर्व प्रमुख ठिकाणी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
Terror Alert in Kashmir l हॉस्पिटलना सज्ज राहण्याचे आदेश :
पहलगाम हल्ल्यानंतर, जम्मू-कश्मीरमधील दोन मोठ्या हॉस्पिटल्सना आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेडिकल कॉलेज जम्मूनं कर्मचार्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
देशभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेल्या अनेक पर्यटकांनी आपले दौरे रद्द केले आहेत किंवा राज्यातून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कसून प्रयत्न सुरू आहेत.






