Swargate Rape Case | पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विरोधकांकडून सरकारवर तीव्र टीका केली जात असून, पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे.
ड्रोनचा वापर सुरू-
या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा अद्याप फरार आहे. पुणे (Swargate Rape Case) पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉड आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे. आरोपी उसाच्या शेतात लपल्याची शक्यता असल्याने तेथे विशेष तपास सुरू असून, पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाकडून कसून शोध घेतला जात आहे.
पोलिसांकडून आरोपीबाबत कोणतीही महत्त्वाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनीही कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांना तत्काळ कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वैद्यकीय अहवालातून धक्कादायक खुलासा-
घटनेनंतर पीडित तरुणीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली असून, पीडितेवर दोनदा अत्याचार (Swargate Rape Case) झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्वारगेट बसस्थानकात तोडफोड-
या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकातील सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनची तोडफोड केली.
शिवसेना नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, “घटना घडली त्या वेळी बस सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनसमोर उभी होती, मग हा प्रकार त्यांच्या लक्षात कसा आला नाही? हे सर्व त्यांच्या संमतीने सुरू आहे का?” असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
महिला सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह-
स्वारगेटसारख्या वर्दळीच्या भागात अशी घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अधिक कठोर पावले उचलून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






