Monsoon Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर आता हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO Maharashtra) यासंदर्भात महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली असून 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसांत अनेक भागांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
राज्यातील बहुतांश भागात पाऊस कमी राहण्याची शक्यता :
गेल्या काही दिवसांत मुंबई (Mumbai) आणि पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) परिसरात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः खानदेश (Khandesh) विभागातील धुळे (Dhule) आणि नंदुरबार (Nandurbar), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मधील अहिल्यानगर (Ahilyanagar) आणि सोलापूर (Solapur), तसेच पश्चिम विदर्भ (West Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) येथील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहू शकते. या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक कमी राहण्याची शक्यता आहे.
Monsoon Update | शेतकऱ्यांना कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला :
हवामानातील या बदलाचा विचार करून शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या भागांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण होईपर्यंत पेरणी करण्याची घाई करू नये, असा सल्ला राज्याच्या कृषी विभागाने (Agriculture Department) दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्येही याच सूचनांचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळित झाले होते. अनेक नद्यांना पूर आला, सखल भागांमध्ये पाणी साचले, झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या तसेच काही ठिकाणी शेतीपिकांचेही नुकसान झाले. मात्र, 8 जुलैपासून पुढील सुमारे 10 दिवस पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.






