Sushma Andhare | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याने राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपवर जोरदार टीका करत हा सारा प्रकार लक्ष विचलित करण्यासाठी रचलेला इव्हेंट असल्याचा आरोप केला आहे.
‘ड्रामा’मागे दुसरे मुद्दे? :
सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी तुलना करत टिपू सुलतान यांनाही समकक्ष स्थान द्यावे, असे विधान केले होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) ने त्यांच्यावर कठोर टीका केली. यावर प्रत्युत्तर देताना सपकाळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या एका जुन्या विधानाचा दाखला देत भाजपला प्रश्न विचारले. या साऱ्या घडामोडींमध्ये सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून थेट निशाणा साधला.
त्यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, मुलुंड येथे घडलेल्या मेट्रो स्लॅब दुर्घटनेपासून आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कथित व्हिडिओप्रकरणापासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हा सगळा वाद उकरून काढला जात आहे. “छत्रपती शिवरायांचा पराक्रम अद्वितीय आहे, यात वाद नाही. पण या मुद्द्यावरून निर्माण झालेली आक्रमकता ही मेट्रो दुर्घटना आणि नार्वेकर प्रकरण झाकण्यासाठी आहे,” असा आरोप त्यांनी केला.
Sushma Andhare | मेट्रो दुर्घटना आणि कारवाई :
दरम्यान, मुंबईतील मुलुंड येथे वडाळा-कासारवडवली मेट्रो-४ मार्गिकेच्या कामादरम्यान सुरक्षा कठड्याचा भाग कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे (Satyajit Salve) यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) संबंधित कंत्राटदारावर ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुलुंड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.
सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये भाजपवर आणखी टीका करत विचारले की, जर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतकीच भावना असती तर यापूर्वीच्या घटनांवरही अशाच प्रकारे आंदोलन झाले असते का? त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही निशाणा साधत, दुर्घटनेनंतर साधे ट्विट न केल्याचा उल्लेख केला. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.






