Sushma Andhare | सातारा डॉक्टर प्रकरण आता राजकीय रंग घेत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे यांनी थेट काही पुरावेच सादर करत चौकशीची कक्षा वाढवण्याची मागणी केली. “निंबाळकर यांचीही चौकशी करा, हे प्रकरण फक्त एका आत्महत्येपुरते मर्यादित नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अंधारे म्हणाल्या, “माझ्या बोलण्याला अधार नाही, असं म्हणणाऱ्यांनी ही पत्रं वाचावीत. मृत डॉक्टर महिलेने आरोग्य विभागातील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, म्हणजेच डॉ. अंशुमन धुमाळ यांना पत्र लिहिलं होतं. त्यामुळे या प्रकरणात एपीआय झायपात्रे, पीएसआय पाटील, डॉ. धुमाळ, निंबाळकरांचे दोन पीए आणि रणजितसिंह निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणलं पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
वर्षा आणि हर्षा हगवणे प्रकरणाचा दाखला देत निंबाळकरांवर आरोप :
अंधारे यांनी पत्रकार परिषदेत आणखी एक गंभीर दावा केला. “रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsingh nimbalkar) आपल्या ताकदीचा वापर करून लोकांवर खोटे गुन्हे दाखल करवतात. वर्षा आणि हर्षा हगवणे प्रकरणातही निंबाळकरांचा थेट उल्लेख आहे. त्या दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये निंबाळकरांचं नाव अनेकदा आहे,” असा दावा करत अंधारे यांनी ती सुसाईड नोट माध्यमांसमोर वाचून दाखवली.
त्या म्हणाल्या की, “या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी निष्पक्ष तपास आवश्यक आहे. आरोपी कोणताही असो, चौकशी व्हायलाच हवी.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Sushma Andhare | महिला आयोगावर अंधारेंची टीका, दररोज पुरावे दाखवणार असल्याची घोषणा :
सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही सडकून टीका केली. “महिला आयोगाला मृत डॉक्टरच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा अधिकार नाही. जर त्यांना खरंच महिलांची काळजी असेल, तर वर्षा आणि हर्षा हगवणे प्रकरणात त्यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही?” असा सवाल अंधारे यांनी केला.
अंधारे पुढे म्हणाल्या, “मी रणजितसिंह निंबाळकर यांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याला घाबरत नाही. मी रोज समोर येऊन नवे पुरावे सादर करणार आहे. सत्य लपवू नका, अन्यथा जनतेसमोर सर्व उघड करीन,” असे त्यांनी स्पष्ट आव्हान दिले. आता या प्रकरणात पुढील तपास आणि राजकीय प्रतिक्रिया काय येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






