Sushant Singh | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. अलीकडेच सीबीआयने २०२० साली घडलेल्या या घटनेवरील आपली क्लोजर रिपोर्ट सादर करत, सुशांतची मृत्यू आत्महत्या असल्याचं सांगितलं आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) क्लीन चिट दिली.
कोणी केला खुलासा?
मात्र या निष्कर्षावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात सलमान खानच्या (Salman Khan) माजी मैत्रीण आणि अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) हिनंही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सुशांतच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आणि बॉलिवूड, न्यायव्यवस्था आणि सरकारवर थेट आरोप केले. तिच्या म्हणण्यानुसार, सुशांतला ड्रग्स देऊन मारण्यात आलं आणि नंतर ती आत्महत्या असल्याचं भासवलं गेलं.
‘संपूर्ण यंत्रणा सुशांतच्या मृत्यूविषयी खोटं बोलतेय’ –
सोमी अलीने तिच्या पोस्टमध्ये बॉलिवूडमधील अंडरवर्ल्डच्या प्रभावाचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत. तिच्या मते, बॉलिवूडमध्ये जे काही खरं आहे, ते कोणी उघडपणे सांगू धजावत नाही. ती लिहिते, “१९९० च्या दशकात मी स्वतः हे सगळं पाहिलं आहे. माझाही एक मित्र आत्महत्येमुळे गमवावा लागला होता. आता जेव्हा पोस्टमार्टम करणारे डॉक्टर देखील सांगतात की सुशांतने आत्महत्या केली नाही, तरी कोणी आवाज उठवत नाही.”
तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरही निशाणा साधत म्हटलं, “पंतप्रधानही गप्प आहेत. जेव्हा हत्या आत्महत्या म्हणून घोषित केली जाते, तेव्हा भविष्यात यासारख्या घटना थांबणार नाहीत.”
सुशांतसाठी न्यायाची मागणी-
याच पोस्टमध्ये तिने शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांनाही टॅग करत म्हटलं की, “माझी तुमच्याकडून थोडी अपेक्षा होती, पण तुम्हीही गप्पच आहात.” सोमी अलीच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुशांतसाठी न्यायाची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक युजर्स सरकार आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींनी यावर मौन बाळगल्याचा निषेध करत आहेत.
दरम्यान, सीबीआयने त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, सुशांतच्या मृत्यूमागे कोणतीही कटकारस्थानाची किंवा हत्येची पावती सापडलेली नाही. परंतु तरीही या प्रकरणातील चर्चा आणि वाद थांबण्याचं नाव घेत नाही.






