Supreme Court | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून वेगळा गट स्थापन करत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटात सहभागी झालेल्या सहा खासदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) संबंधित खासदारांना नोटीस बजावली असून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात प्रश्न :
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्याकडे स्वतंत्र गटाला मान्यता देण्याची मागणी केली होती. त्यानंतर अध्यक्षांनी या गटाला मान्यता दिली आणि पुढे संबंधित खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडीला ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानले जात असतानाच, विधान परिषदेचे उपसभापती म्हणून सचिन अहिर (Sachin Ahir) यांनीही अर्ज दाखल केल्यामुळे पक्षातील अंतर्गत घडामोडींवर अधिक चर्चा सुरू झाली.
लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर प्राथमिक सुनावणीदरम्यान न्यायालयाने सहा खासदारांना नोटीस पाठवत दोन आठवड्यांच्या आत आपली बाजू लेखी स्वरूपात मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित खासदारांसमोरील कायदेशीर आव्हान अधिक गंभीर झाले असून पुढील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Supreme Court | शिंदे गटासमोरील आव्हान वाढण्याची शक्यता :
या न्यायालयीन प्रक्रियेचा परिणाम केवळ सहा खासदारांपुरता मर्यादित राहणार नसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटावरही त्याचे राजकीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि अनिल देसाई (Anil Desai) यांनी संबंधित सहा खासदारांना नोटीस बजावत सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. आता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडूनही नोटीस आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
दरम्यान, केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते आणि त्यांच्या पक्षाला काही मंत्रीपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याचवेळी न्यायालयाच्या नोटीसमुळे राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण आले आहे. नोटीस मिळालेल्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar), संजय ऊर्फ बंडू जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या सर्वांनी ठाकरे गट सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. राज्यात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) मोहिमेनंतर झालेल्या या राजकीय घडामोडींना आता न्यायालयीन वळण मिळाले आहे.






