गणेशभक्तांसाठी मोठी खूशखबर! ‘या’ महामार्गांवर टोल भरावा लागणार नाही

On: September 8, 2026 7:38 PM
Ganeshotsav 2026
---Advertisement---

Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्यातील विविध भागांतून कोकणाकडे जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत गणेशभक्तांना काही प्रमुख महामार्गांवर टोल भरावा लागणार नाही. प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत व्हावा, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.

प्रमुख महामार्गांवर गणेशभक्तांना सवलत :

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले (Shivendrasinh Bhosale) यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या टोलसवलतीची माहिती दिली. मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांना मुंबई-गोवा महामार्ग (NH-66) आणि मुंबई–बंगळूर महामार्ग (NH-48) या महत्त्वाच्या मार्गांवर टोलमाफीचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या भाविकांच्या प्रवासाचा खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे.

याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अखत्यारीतील संबंधित मार्गांवरही ही टोलसवलत लागू केली जाणार आहे. अटल सेतूमार्गे कोकणात प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनाही या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. 11 सप्टेंबरपासून सुरू होणारी ही सुविधा 27 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध राहणार असून, गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्या संख्येने होणाऱ्या कोकण प्रवासाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Ganeshotsav 2026 | पासची व्यवस्था आणि वाहतूक नियोजन :

टोलमाफीचा लाभ नेमक्या पात्र वाहनांना मिळावा, यासाठी विशेष पास किंवा स्टिकरची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन’ या नावाने हा पास दिला जाणार असून, त्यावर वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केलेले असेल. संबंधित पास पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि RTO कार्यालयांमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोकणाकडे जाताना घेतलेला हाच पास परतीच्या प्रवासासाठीही वैध राहणार आहे.

कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसनाही या टोलमाफीचा फायदा मिळणार आहे. एसटी बससाठी पोलीस आणि RTO यांच्या समन्वयातून आवश्यक पासची व्यवस्था केली जाणार आहे. गणेशोत्सवात मुंबई आणि राज्यातील इतर शहरांतून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहतूक व्यवस्थित सुरू राहावी आणि गणेशभक्तांना प्रवासात अडथळे येऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन आणि विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.

News title : Ganesh Festival Toll Waiver Announced

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now