Sudarshan Ghule | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबांमधून अनेक खळबळजनक माहिती समोर आली आहे. जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांनीही सुग्रीव कराडचे नाव घेतले असून, त्याच्या सांगण्यावरूनच सर्व प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणातील सुदर्शन घुलेनेही पोलिसांसमोर खळबळजनक कबुली दिली आहे.
कराडच्या सांगण्यावरूनच घडला हल्ला-
आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या कबुलीजबाबानुसार, सुग्रीव कराडने (Sugriv Karad) सुदर्शन घुलेवर मारहाण करण्यास संतोष देशमुखांना प्रवृत्त केलं होतं. त्याचबरोबर फरार आरोपी कृष्णा आंधळेनेही पोलिसांसमोर सुग्रीव कराडचं नाव घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सुग्रीव कराड हा केजमधील (Kej) रहिवासी असून, तो स्वतःही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे, अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर तब्बल चार महिन्यांनी आरोपींनी पोलिसांसमोर आपली कबुली दिली. सुदर्शन घुलेने सरपंच देशमुखांची हत्या केल्याची कबुली दिली असून, त्याच्या जबाबातून संपूर्ण घटनेचा भीषण तपशील समोर आला आहे. पोलिस तपासात त्याने दिलेल्या माहितीमुळे गुन्ह्याचे स्वरूप अधिक गंभीर दिसून येत आहे.
दोन तास चाललेला अमानुष मारहाणीचा प्रकार
सुदर्शन घुलेच्या कबुलीनुसार, संतोष देशमुख यांना वाहनातून खाली उतरवल्यानंतर त्यांचे कपडे उतरवून त्यांना पूर्ण उघडं केलं. त्यानंतर लाकडी काठी, पांढऱ्या प्लास्टिक पाईप, क्लच वायर, आणि गॅस पाईप यांसारख्या वस्तूंनी सलग दोन तास अमानुषपणे मारहाण करण्यात आली. ही क्रूर मारहाण इतकी भीषण होती की, ती ऐकूनच अंगावर शहारे येतील.
याच दरम्यान, जयराम चाटेच्या मोबाईलवरून सुदर्शन घुलेची विष्णू चाटे (Vishnu Chate) याच्याशी दोन ते तीन वेळा फोनवर चर्चा झाली होती, असा धक्कादायक खुलासाही सुदर्शनने केला. या संभाषणांमुळे या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग होता का, याची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.






