Sting Drink Ban | राज्य सरकारने (Maharashtra Government) विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत शाळांच्या परिसरात स्टिंग (Sting) या शीतपेयाच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration – FDA) विभागात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून शाळांपासून 500 मीटर परिसरात या पेयाची विक्री केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
500 मीटर परिसरात विक्रीस मनाई :
राज्यात गुटखा, पानमसाला आणि सिगारेटसारख्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर शाळा परिसरात आधीपासूनच निर्बंध आहेत. आता त्याच यादीत स्टिंग या शीतपेयाचाही समावेश करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाची सूत्रे तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी स्वीकारल्यानंतर या विषयावर सरकारने निर्णय घेतला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग पेय विक्रीस बंदी घालण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली.
या संदर्भातील मुद्दा आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर सरकारने या विषयाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचा निर्णय जाहीर केला. यानुसार शाळांच्या आसपास स्टिंग पेयाची विक्री आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा चर्चेत :
विधानसभेत बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग या पेयामध्ये कॅफिन आणि साखरेचे प्रमाण एकत्रित असल्याने ते विद्यार्थ्यांसाठी व्यसनाधीनतेस कारणीभूत ठरू शकते, अशी चिंता व्यक्त केली. या उत्पादनाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते आणि त्यासंदर्भातील काही बाबींचा उल्लेख करत त्यांनी सरकारकडे 18 वर्षांखालील मुलांना या पेयाची विक्री रोखण्यासाठी नियम तयार करणार का, आयुक्तांना विशेष अधिकार देणार का आणि या विषयावर कठोर भूमिका घेणार का, असे प्रश्न उपस्थित केले.
मंत्री नरहरी झिरवळ यांनी उत्तर देताना शाळांच्या परिसरात स्टिंग पेयाची विक्री होत असल्याचे काही प्रमाणात मान्य केले. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शिक्षक आणि मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांमध्ये या पेयाबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांच्या क्षमतेबाबत आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी मंत्री नरहरी झिरवळ यांनी तुकाराम मुंढे यांचा “मुंढे साहेब” असा उल्लेख केल्यावर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी त्यावर आक्षेप नोंदवत सभागृहात प्रतिक्रिया व्यक्त केली.






