Dr. Shirish Valsangkar | सोलापूर येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्येप्रकरणी, त्यांच्याच रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने (Manisha Mahesh Musale alias Manisha Mane) हिला अटक करण्यात आली आहे. तिला रविवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. वळसंगकर यांचे पुत्र डॉ. आश्विन (Dr. Ashwin Shirish Valsangkar) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीषा मानेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, तिच्या रुग्णालयातील कथित वर्चस्वाची आणि भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.
रुग्णालयातील कर्मचारी
मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये (Valsangkar Hospital) गेल्या २० ते २५ वर्षांपासून कार्यरत होती. शालेय शिक्षण घेत असतानाच ती कामाला लागली आणि हळूहळू तिने डॉ. वळसंगकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. ती कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वावरू लागली. याच काळात तिने रुग्णालयाच्या प्रशासकीय कामातही आपले स्थान निर्माण केले.
मिळालेल्या माहितीनुसार, कालांतराने रुग्णालयात तिचे महत्त्व इतके वाढले की, तिच्या परवानगीशिवाय कोणतेही महत्त्वाचे काम होत नसे. डॉ. वळसंगकर वगळता इतर कर्मचारीही तिला काहीसे घाबरून असत, असे म्हटले जाते. सामान्य परिस्थितीतून येऊन प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करताना तिच्या राहणीमानातील बदलही चर्चेचा विषय ठरला आहे.
वादाची पार्श्वभूमी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
मनीषा माने कुटुंबातील सदस्यांप्रमाणे असल्याने तिला कामावरून काढण्यावरून कुटुंबात मतभेद असल्याचीही माहिती आहे. काही काळापूर्वी मनीषाने डॉ. शिरीष वळसंगकर यांना एक ई-मेल पाठवला होता. यामध्ये तिने आपला पगार कमी केल्याबद्दल आणि अधिकार कमी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ‘हे असेच सुरू राहिल्यास मी आत्मदहन करेन’ अशी धमकीही तिने या ईमेलमध्ये दिली होती. या धमकीच्या ईमेलमुळे डॉ. वळसंगकर हे मानसिक तणावाखाली आले होते आणि त्यांनी तिला बोलावून समजावण्याचा प्रयत्नही केला होता.
डॉ. आश्विन यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात (Sadar Bazaar Police Station) दिलेल्या फिर्यादीत, मनीषा मानेच्या याच त्रासाला कंटाळून वडिलांनी १८ एप्रिल रोजी रात्री राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, असा आरोप केला आहे. पोलिसांनी या फिर्यादीच्या आधारावर गुन्हा दाखल करून मनीषा मानेला अटक केली असून, पोलीस कोठडीदरम्यान तिच्या भूमिकेचा अधिक तपास केला जात आहे.
Title : Solapur Dr. Shirish Valsangkar Officer’s Role Investigated






