‘राजकारण करू नका, तुमची मदत वाढवा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारेंना झापलं

On: September 30, 2025 12:00 PM
---Advertisement---

Jyoti Waghmare | सीना नदीला आलेल्या भयंकर पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांतील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. उठसूट पूरपरिस्थितीची पाहणी करायला येणाऱ्या या राजकीय नेत्यांमुळे स्थानिक प्रशासनावर मोठा ताण येत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते पूरग्रस्त भागांचा दौरा करत असताना, मदतकार्याच्या मुद्द्यावरून प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे समोर आले आहे. शिंदेसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून गावकऱ्यांच्या समस्या ऐकल्या. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारेंना सुनावल्याचे पाहायला मिळाले. राजकारण करू नका, तुमची मदत वाढवा, असा सल्ला जिल्हाधिकऱ्यांनी ज्योती वाघमारेंना दिला.

“राजकारण नंतर करा, मदत वाढवा”

जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारे यांना कडक शब्दांत सांगत “राजकारण करू नका, तुमची मदत वाढवा,” असा सल्ला दिला. मदतकार्यात कोणताही अडथळा आणू नका, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः माढा-करमाळासारख्या अतिवृष्टीग्रस्त भागात हजारो लोक अडकले असल्याने, तातडीच्या मदतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ज्योती वाघमारे आणि जिल्हाधिकारी यांच्यातील हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रशासकीय मदत आणि राजकीय मागणी

वाघमारे गटाने यावेळी पूरग्रस्त ३००० लोकांना तातडीने तयार जेवणाचे किट्स देण्याची मागणी केली. स्वतः २०० किट्स घेऊन आलेल्या वाघमारे गटाला उद्देशून, प्रशासकीय मदतीची व्याप्ती आणि राजकीय मदतीच्या मर्यादा जिल्हाधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्या. या संवादादरम्यान, संकटकाळात एकजुटीने काम करण्याऐवजी राजकारण टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० किलो तांदूळ, १० किलो गहू दिले जात आहेत, तसेच दोन ते तीन दिवसांत प्रत्येकी ५००० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातील, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मदतीची माहिती दिली.

ज्योती वाघमारेंकडून संताप व्यक्त

या सगळ्या प्रकारानंतर ज्योती वाघमारे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोचवणे हा माझा गुन्हा आहे का? मी जिल्हाधिकाऱ्यांना काय दोन नंबरच्या धंद्यासाठी, टेंडरच्या टक्केवारीसाठी फोन केला होता का? लोकांचा आवाज बनणे हा जर गुन्हा असेल तर कुणी फासावर लटकवले तरी मी चालेल, मी लढत राहीन, असे ज्योती वाघमारे यांनी म्हटले.

Join WhatsApp Group

Join Now