Sinhagad Fort Mystery | पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर पाच दिवसांपूर्वी साताऱ्याचा तरुण गौतम गायकवाड गायब झाला होता. तानाजी कड्यावरून तो पाय घसरून दरीत पडल्याची माहिती त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिली होती. यानंतर पुणे ग्रामीण पोलिस, हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. मात्र, सलग चार दिवस या मोहिमेला यश आले नव्हते. अखेर पाचव्या दिवशी गौतम सापडला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बुधवारी नेमकं काय घडलं? :
२४ वर्षीय गौतम गायकवाड हा मूळ फलटण (जि. सातारा)चा असून सध्या हैदराबादमध्ये राहत होता. तो आपल्या मित्रांसोबत – महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी – सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. बुधवारी दुपारी ४:३० वाजता ही मंडळी किल्ल्यावर पोहोचली. सायंकाळी तानाजी कड्याजवळ पोहोचल्यावर गौतमने ‘लघुशंका करून येतो’ असं सांगून तो दूर गेला. मात्र, त्यानंतर तो परत आला नाही. (Sinhagad Fort Mystery)
या शोधमोहीमेत एक मोठा पेच सीसीटीव्ही फुटेजमुळे निर्माण झाला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कॅमेऱ्यात गौतम पळताना आणि लपतानाही दिसला होता. त्यामुळे तो दरीत पडला नव्हता, हे स्पष्ट झालं. पण मग तो नेमका कुठे गेला होता आणि का गायब झाला होता, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या घटनेत त्याने मुद्दाम अशी कृती केली का, हा संशय पोलिसांना येऊ लागला आहे.
Sinhagad Fort Mystery | रहस्य कायम, पोलिसांच्या चौकशीनंतरच सत्य स्पष्ट :
सध्या गौतम रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची तब्येत स्थिर असल्याचे प्राथमिक वृत्त मिळाले आहे. मात्र, त्याच्या गायब होण्यामागील खरी कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. मित्रांच्या जबाबात आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये विसंगती असल्यामुळे पोलिसांना संशय आहे की, ही घटना केवळ अपघात नसून दुसरे काही कारण असू शकते. (Sinhagad Fort Mystery)
गौतमकडून जबाब नोंदवल्यानंतरच प्रकरणातील गूढ उलगडेल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत सिंहगड किल्ल्यावर घडलेली ही घटना स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.






