Rishabh Tandon | ज्येष्ठ अभिनेते असरानी (Asrani) यांच्या निधनाच्या दुःखातून चित्रपटसृष्टी सावरत नाही तोच, संगीत विश्वातून आणखी एक दुःखद बातमी आली आहे. ‘फकीर’ (Faqeer) या गाण्यामुळे प्रसिद्धीस आलेले गायक, संगीतकार आणि अभिनेते ऋषभ टंडन (Rishabh Tandon) यांचे ऐन दिवाळीत निधन झाले आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने संगीत क्षेत्रात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
दिवाळीसाठी आले होते दिल्लीला
ऋषभ टंडन (Rishabh Tandon) आपल्या कुटुंबासोबत दिवाळी (Diwali) साजरी करण्यासाठी दिल्लीला (Delhi) आले होते. मात्र, २१ ऑक्टोबर रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ऋषभ त्यांच्या शांत स्वभावासाठी आणि संगीतावरील प्रेमासाठी ओळखले जात होते.
आपल्या गायनासोबतच ऋषभ यांनी ‘फकीर – लिव्हिंग लिमिटलेस’ आणि ‘रशना: द रे ऑफ लाईट’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूकही दाखवली होती. त्यांची ‘ये आशिकी’, ‘चांद तू’, ‘धू धू कर के’, आणि ‘फकीर की जुबानी’ ही गाणीही बरीच लोकप्रिय झाली होती. विशेष म्हणजे, त्यांची अनेक गाणी अद्याप अप्रकाशित आहेत.
Rishabh Tandon | संगीत क्षेत्रावर शोककळा
ऋषभ टंडन (Rishabh Tandon) यांना पाळीव प्राण्यांचीही खूप आवड होती. मुंबईतील (Mumbai) त्यांच्या घरी अनेक मांजरी, कुत्रे आणि पक्षी आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत दुःख व्यक्त केले आणि श्रद्धांजली वाहिली.
विशेष म्हणजे, ऋषभ यांची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट त्यांच्या वाढदिवसाची होती, जी त्यांच्या पत्नीने शेअर केली होती. त्यांच्या अकाली निधनाने संगीत आणि चित्रपट क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.






