चांदीची गगनभरारी! पुढील वर्षी दर ‘इतक्या’ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता

On: December 14, 2025 11:12 AM
Silver Rate
---Advertisement---

Silver Record Break Price | यंदाचे वर्ष चांदीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. गेल्या काही महिन्यांत चांदीच्या दरात तब्बल 120 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली असून, देशांतर्गत बाजारात चांदी पहिल्यांदाच दोन लाख रुपयांच्या घरात पोहोचली आहे. या तेजीमुळे चांदीने तब्बल 46 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला आहे. 1979 नंतर इतकी मोठी झेप चांदीच्या दरात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. (Silver Record Break Price)

अलीकडे चांदीच्या दरात थोडीफार घसरण झाली असली, तरी तज्ज्ञांच्या मते ही केवळ तात्पुरती आहे. आगामी वर्षात चांदी पुन्हा एकदा मोठी भरारी घेऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बाजारातील परिस्थिती पाहता पुढील वर्षी चांदीचे दर 2 लाख 40 हजार ते 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच सध्याच्या दरांपेक्षा सुमारे 25 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

चांदीच्या दरात तुफान तेजी का? :

हर्षल दासानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदीच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे, मात्र उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी आहे. खाणीतून मिळणारा चांदीचा पुरवठा मर्यादित राहिल्याने दरांवर थेट परिणाम होत आहे. जागतिक बाजारात चांदीचा एकूण पुरवठा सध्या सुमारे 810 दशलक्ष औंसवर स्थिरावलेला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास 70 ते 80 टक्के चांदी ही शिसे, जस्त आणि तांबे यांच्या उत्खननादरम्यान उपउत्पादन म्हणून मिळते. त्यामुळे या धातूंचे उत्पादन कमी झाले, तर चांदीचा पुरवठाही घटतो. ताज्या आकडेवारीनुसार, 2026 पर्यंत चांदीचा पुरवठा दबावातच राहण्याची शक्यता आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती कायम राहिल्यास चांदीच्या दरात आणखी मोठी वाढ होऊ शकते.

Silver Record Break Price | औद्योगिक मागणीने वाढवली चमक :

तज्ज्ञांच्या मते, चांदीच्या दरवाढीमागे औद्योगिक मागणी हा महत्त्वाचा घटक ठरत आहे. विशेषतः अक्षय ऊर्जा क्षेत्रात, खासकरून सौरऊर्जा प्रकल्पांसाठी चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या चार वर्षांत सोलर एनर्जी सेक्टरमधील चांदीची मागणी दुप्पट झाली आहे. (Silver Record Break Price)

2020 मध्ये सौरऊर्जा क्षेत्रासाठी चांदीची मागणी 94.4 दशलक्ष औंस इतकी होती, ती 2024 मध्ये वाढून थेट 243.7 दशलक्ष औंसवर पोहोचली आहे. यंदा एकूण चांदीच्या मागणीत सौरऊर्जा प्रकल्पांचा वाटा सुमारे 21 टक्के आहे. याशिवाय जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चितता, अमेरिकेतील राजकीय घडामोडी आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत असून, चांदीला त्याचा मोठा फायदा होत आहे.

एकूणच, वाढती औद्योगिक मागणी, मर्यादित पुरवठा आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी चांदी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

News title : Silver Record Break Price

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now