Shreyas Talpade | राज्यात खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईची मोठी चर्चा होत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेनंतर भेसळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या पार्श्वभूमीवर अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) यांनी आपल्या कुटुंबाच्या आहारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
भेसळीच्या बातम्यांनंतर घरातील आहारात केला बदल :
प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) राज्यभरात कठोर कारवाई करत आहे. या कारवायांमुळे भेसळीचा मुद्दा सर्वसामान्यांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत श्रेयस तळपदे यांनी भेसळीबाबत आपली चिंता व्यक्त केली.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या भेसळीच्या अनेक व्हिडिओंपैकी काही जुने किंवा दिशाभूल करणारे असू शकतात, असे त्यांनी नमूद केले. मात्र सर्व व्हिडिओ खोटे मानता येत नाहीत आणि काही प्रकरणांमध्ये वास्तव असल्याचे दिसून येते, असेही त्यांनी सांगितले. तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेनंतर समोर येणाऱ्या कारवायांमुळे परिस्थितीचे गांभीर्य अधिक स्पष्ट झाल्याने त्यांनी आपल्या घरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
Shreyas Talpade | मुलीच्या आहारातही बदल, विश्वासार्ह ठिकाणाहूनच खरेदी :
श्रेयस तळपदे यांनी सांगितले की, यापूर्वी त्यांच्या घरी आठवड्यातून सात ते आठ वेळा पनीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असे. मात्र आता त्यांच्या मुलीच्या आहारातूनही अशा पदार्थांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. स्वतःही ते रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिण्याची सवय पूर्णपणे बंद केली असून, चहामध्येही दूध टाळत आहेत. त्याऐवजी ते कोरा चहा किंवा ब्लॅक कॉफीला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पनीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करण्याची वेळ आलीच, तर केवळ विश्वासार्ह आणि खात्रीशीर ठिकाणावरूनच ते विकत घेतले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, मुंबईसह राज्यातील अनेक भागांत दूध आणि खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बनावट औषधे, गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली असून, अवघ्या 15 दिवसांत 250 हून अधिक व्यक्तींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.






