मुंबई कोस्टल रोडवर थरार! बोगद्यात धावत्या कारला भीषण आग, शेकडो वाहनांच्या रांगा

On: July 15, 2026 2:46 PM
Coastal Road Accident
---Advertisement---

Coastal Road Accident | मुंबई (Mumbai) येथील कोस्टल रोडवर बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. बोगद्यात एका कारला अचानक आग लागल्यानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे शेकडो वाहने बोगद्यात अडकली, तर नरीमन पॉईंटकडून येणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल आणि वाहतूक विभागाने तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.

बोगद्यात कारला आग, शेकडो वाहनांचा खोळंबा :

बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोस्टल रोडच्या बोगद्याच्या सुरुवातीच्या भागात धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीपूर्वी काही वाहनांची किरकोळ धडक झाल्याची माहिती समोर आली असून त्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले. या घटनेमुळे बोगद्यात एकामागोमाग उभ्या असलेल्या सुमारे 450 ते 500 वाहनांची रांग लागली आणि संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. नरीमन पॉईंटकडून कोस्टल रोडकडे जाणाऱ्या वाहनांनाही थांबवण्यात आले.

घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये बोगद्यात मोठ्या संख्येने वाहने अडकलेली दिसत आहेत. अनेक प्रवासी आपल्या वाहनांमधून बाहेर पडून नेमके काय घडले याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

Coastal Road Accident | वाहतूक विस्कळीत, पर्यायी मार्गाने वाहने बाहेर काढली :

घटनास्थळी पोहोचल्यानंतर वाहतूक पोलिसांनी आणि ट्रॅफिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगद्यात अडकलेल्या वाहनांना मार्गदर्शन सुरू केले. परिस्थिती लक्षात घेऊन वाहनचालकांना हळूहळू रिव्हर्स घेण्यास सांगण्यात आले आणि पर्यायी पद्धतीने वाहने बाहेर काढून मार्ग मोकळा करण्याचे काम करण्यात आले. अग्निशमन दलाने कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने कारवाई केली.

या दुर्घटनेचा परिणाम शहरातील वाहतुकीवरही झाला. वरळी (Worli) ते मरीन लाईन्स (Marine Lines) दरम्यानच्या सुमारे 11 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली. तसेच पेडर रोड (Peddar Road) आणि भुलाभाई देसाई रोड (Bhulabhai Desai Road) या परिसरातही मोठी वाहतूक कोंडी झाली असून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. बोगद्यात अडकलेल्या काही प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रशासनाने लवकर मदत करून सुरक्षित बाहेर काढावे, अशी मागणी केली होती.

News Title: Car Fire Halts Mumbai Coastal Road

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now